राणे-केसरकरांनी एकत्र येत सावंतवाडीत उडवला महाविकास आघाडीचा धुव्वा

राणे-केसरकर मनोमिलनानंतर तळकोकणात युतीचा पहिला विजय
Deepak Kesarkar - Narayan Rane
Deepak Kesarkar - Narayan Rane Mumbai Tak

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यातील मंत्री दीपक केसरकर यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. जिल्ह्यातील महत्वाच्या अशा सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनेलने सर्व १५ जागांवर विजय संपादन केला. महाविकास आघाडीच्या खासदार विनायक राऊत यांच्या सहकार वैभव पॅनेलच्या एकाही उमेदवाराला गुलाल उधळण्यात यश आलं नाही.

या निवडणुकीत दत्ताराम कोळंबेकर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. तर जाहीर झालेल्या निकालामध्ये सर्वंच गटांमध्ये सुरुवातीपासून देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनेलने वर्चस्व राखलं. अंतिमतः संस्था गटाच्या सर्व ६ जागांवर, व्यक्ती गटातून ४ पैकी ४ जागांवर विजय मिळवला. तसंच इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती जमाती या गटांच्या एका-एका जागंवारही भाजप-शिंदे गटाने गुलाल उधळला. याशिवाय शेवटी जाहीर झालेल्या महिलांच्या दोन्ही जागांवरही विजय मिळवला आहे.

मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनात यांच्या मार्गदर्शनाखाली, तर जिल्हा बँक संचालक महेश सारंग, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी व माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. तळकोकणात दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्या मनोमिलनानंतर हा युतीचा पहिला विजय मानला जात आहे.

विजयी उमेदवार असे (कंसात मते) :

  • संस्था गट - प्रवीण देसाई (२७), आत्माराम गावडे (२७), दत्ताराम हरमलकर (२७), प्रभाकर राऊळ (२६), रघुनाथ रेडकर (२५), प्रमोद सावंत (२६).

  • व्यक्ती गट - प्रमोद गावडे (३२५), शशिकांत गावडे (२८६), ज्ञानेश परब (२९६), विनायक राऊळ (२७८).

  • महिला - अनारोजीन लोबो (३२१), रेश्मा निर्गुण (३२०).

  • इतर मागास वर्ग - नारायण हिराप (३३२),

  • अनुसूचित जाती जमाती - भगवान जाधव (३३९).

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in