शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र हा दौरा आता लांबणीवर पडला आहे. याचं कारण १० जूनला राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचं मतदान आहे. महाराष्ट्रातल्या सहा जागांसाठी हे मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक आमदारासाठी मतदानाची प्रक्रिया महत्त्वाची असते. अशात आदित्य ठाकरे हे १० जूनला दौऱ्यावर जाणार नसून त्यांच्या दौऱ्याची तारीख शनिवारी जाहीर केली जाणार आहे. शिवसेनेच्या अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा अर्थ काय?
राज्यसभेच्या मतदानाची तारीख गुरूवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. १० जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र आता मतदानामुळे त्या दिवशी त्यांना जाता येणार नाही. ते नेमके दौरा कधी करणार याची तारीख शनिवारी जाहीर केली जाणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्येच्या दौऱ्याआधीच शिवसेनेचे नाशिकमधले पदाधिकारी अयोध्येत पोहचले आहेत. अयोध्येत आदित्य ठाकरेंच्या हस्ते शरयू नदीची आरती केली जाणार आहे. तसंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांसह आदित्य ठाकरे इतरही मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत.