Exclusive : रोखठोकमधून अजित पवारांची भूमिका मांडली का? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं
संजय राऊत यांनी मुंबई तकला विशेष मुलाखत दिली. यात त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकांवर प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच महाविकास आघाडी म्हणून आपण भूमिका मांडल्याचं स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडाच्या बातम्या फेटाळून लावल्या आणि मागील काही दिवासांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यात प्रयत्न केला. मात्र यानंतर आता महाराष्ट्रात अजित पवार विरुद्ध शिवसेना (UBT) नेते संजय राऊत असा वाद रंगताना दिसत आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या रोकठोक या सदरामध्ये काही लिखाण केलं, त्यात त्यांनी अजित पवार यांची भूमिका मांडली, असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला अन् यावरुनच अजित पवार यांनी राऊत यांच्यावर थेट टीका केली. यानंतर वाद सुरु झाला.
दरम्यान या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबई तकला विशेष मुलाखत दिली. यात त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकांवर प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच महाविकास आघाडी म्हणून आपण भूमिका मांडल्याचं स्पष्ट केलं.
संजय राऊत मुंबई तकशी बोलताना नेमकं काय म्हणाले?
आपण एकत्र आहोत.. महाविकास आघाडी मजबूत रहावी हीच आमची इच्छा :
अजित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, प्रमुख स्तंभ आहेत. आमच्यासारखे काही लोक महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. आमच्या महाविकास आघाडीला हात लावायचा नाही. शिवसेना फोडली तेव्हा महाविकास आघाडीला धक्का बसला होता. तेव्हा हे बरोबर नाही, अशाप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन कोणी पक्ष फोडणं ही हुकुमशाही आहे, हा दहशतवाद आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी घेतली. स्वतः अजित पवार यांनी भूमिका घेतली. ते आमच्या पाठीशी ठाम उभे होते. ते काय आमचे प्रवक्ते आहेत का? राष्ट्रवादीवर तेच संकट येत आहे हे दिसतं होतं. स्वतः शरद पवार यांनी हे जाहिर भाषणात सांगितलं आहे, देशाच्या गृहमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं, भेट घेतली.
मी अजित पवार यांना आधीच सांगितलं होतं.. खुलासा करा :
अजित पवार यांच्याविषयी या वावड्या उठतं आहेत, याबाबत माझ्या रोकठोक सदरात लिहण्यापूर्वी अशा बातम्या, वावड्या होत्या. म्हणून मी लिहिलं. त्याबाबत त्यांनी खुलासा केला पाहिजे हे मी त्यांना सांगितलं. नागपूरमध्येही मी त्यांना भाषण करण्याचा सल्ला दिला. विमानातही आमची चर्चा झाली. जे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काल केलं हे आधीच करा म्हणून सल्ला होता.









