IPL BLOG: देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माझ्या मते ना जगात काही गोष्टी शाश्वत आहेत, त्या कधीच बदलणार नाहीत. सूर्य प्रत्येक दिवशी त्याच्या नित्यनेमाप्रमाणे पुर्वेकडून उगवणार पश्चिमेकडून मावळणार, आभाळात ढग दाटून आले की पाऊस हा पडणारच आणि आयपीएलचा कोणताही हंगाम असो विराट कोहलीची RCB माती खाणारच…तर काल म्हणजेच ११ ऑक्टोबरला विराटच्या आयपीएल कॅप्टन्सीचा अखेर झाला. आपल्या कारकिर्दीत संघाला एक ट्रॉफी जिंकवून देण्याचं विराटचं स्वप्न अखेरीस स्वप्नच राहिलं.

ADVERTISEMENT

साधारण २०१३ च्या दरम्यान विराटकडे RCB ची कॅप्टन्सी आली. पण या ७ वर्षांच्या कॅप्टन्सीमध्ये विराट कोहली फक्त एकदा संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात यशस्वी ठरला. संपूर्ण स्पर्धेचा विचार करायला गेला तर RCB ने २००९, २०११ आणि २०१६ असे तीन हंगाम अंतिम फेरीत प्रवेश केला, पण ट्रॉफी हातात घेण्याचं भाग्य या संघाच्या नशिबी आलंच नाही.

RCB च्या खराब कामगिरीचं विश्लेषण प्रत्येक जण आपापल्यापरीने करत आलाय. परंतू माझ्यामते विराटचा ७-८ वर्षांचा कॅप्टन्सीचा काळ हा बहुतांश वेळ (काही ठराविक अपवाद वगळता) दुसऱ्यावर अवलंबून राहिला आहे. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी अशीच काहीशी गरत विराटच्या RCB ची झाली आहे.

हे वाचलं का?

एक खेळाडू, एक फलंदाज म्हणून विराट कोहलीच्या गुणवत्तेबद्दल कधीच कोणाच्याही मनात शंका यायला नको. विराट हा जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. त्याच्या फटक्यांमध्ये नजाकत असते, तंत्रशुद्धता असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचे फटके बघणं हे प्रेक्षकांना आवडतं. परंतू दुर्दैवाने मोक्याच्या क्षणांमध्ये विराट कोहली कधीच चतूर कॅप्टन म्हणून समोर आला नाही. चुकीचे निर्णय, चुकीची संघ निवड यामुळे विराटने आतापर्यंत अनेकदा हातात आलेली विजेतेपदाची संधी गमावली आहे.

भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही विराटच्या कॅप्टन्सीमधली हीच चूक हेरली आहे. पाहूया काय म्हणतो गौतम गंभीर…

ADVERTISEMENT

कॅप्टन म्हणून विराट कोहलीला खूप वेळ मिळाला आहे. आठ वर्षांचा कालावधी हा खूप असतो. एक चांगला कॅप्टन होण्यासाठी लागणारी चतुरता आणि रणनिती ही विराटकडे कधीच नव्हती. तुम्हाला सामन्याचं पारडं कुठे झुकतंय याचा अंदाज घेऊन योग्य वेळी निर्णय घेत सामन्यात पुढे रहायचं असतं. तुमच्या अंगात कितीही उर्जा असेल पण ती उर्जा तुम्हाला ट्रॉफी जिंकण्यासाठी पुरेशी नसते. तुम्हाला कॅप्टन म्हणून एक चांगली रणनिती आखता यायला हवी, सामन्यात तुम्ही दोन-तीन पावलं पुढचा विचार करणं गरजेचं असतं. जगातले सर्व बेस्ट टी-२० कॅप्टन हे असंच करतात. विराटने प्रदीर्घ काळ भारतीय संघाचंही तिन्ही क्रिकेटमध्ये नेतृत्व केलंय, पण माझ्या मते विराट हा चांगला रणनितीकार नाहीये.

गौतम गंभीर – माजी क्रिकेटपटू

ADVERTISEMENT

आता यात न समजण्यासारखं काहीच नाही. विराटने भलेही RCB ला अच्छे दिन दाखवले असतील पण तो कधीही संघाला त्या अच्छे दिन पर्यंत घेऊन जाऊ शकला नाही. तुम्ही कर्णधार म्हणून किती यशस्वी झालात याचं मोजमाप हे तुम्ही संघाला मिळवून दिलेल्या विजेतेपदांवर होतं. दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये विराट कोहलीची या बाबतीतली पाटी ही कोरीच राहिली आहे. आपण फक्त आयपीएलचा विचार करायला गेला तर संपूर्ण RCB संघ हा विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स या दोन खांबी तंबूंवर विसावलेला आहे. या संघात दुसरे खेळाडू येत-जात असतात, परंतू दुर्दैवाने कामगिरीतलं सातत्य आणि मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी न करता येणं हे RCB ला नेहमी सतावत आलं आहे.

संघातले खेळाडू चांगली कामगिरी करत नसतील तर त्यांना पर्याय म्हणून दुसऱ्यांना संधी देणं महत्वाचं असतं. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातही विराट कॅप्टन म्हणून निर्णय घेण्यात मोक्याच्या क्षणी चुकला आणि त्याचा फटका संघाला बसला. संपूर्ण सिझनभर RCB ने जरी चांगली कामगिरी केली असली तरीही जर ऐनवेळेला जर काही चुकांमुळे संधी निघून जाणार असेल तर विराटने कॅप्टन्सी सोडलेलीच बरी. आता पाहूयात विराट आपल्या अखेरच्या मॅचमध्ये कुठे-कुठे फसत गेला ते….

१) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग, धाडसी निर्णय?

शारजाह चं मैदान हे बॅटींगसाठी नंदनवन मानलं जातं. या मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पडतो. परंतू गेल्या काही सामन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासला तर शारजाहच्या पिचने फलंदाजांना चकवा दिलाय. अशा परिस्थितीतही RCB ने पहिले बॅटींगचा निर्णय घेतला. एलिमिनेटरच्या सामन्यात खेळत असताना RCB ने किमान १५० + स्कोअरचं टार्गेट हे डोळ्यासमोर नक्कीच ठेवलं असणार. विराट आणि पडीक्कलने संघाला चांगली सुरुवातही करुन दिली.

परंतू पॉवरप्लेनंतर शारजाहच्या पिचने RCB ला चकवा दिलाच. KKR च्या स्पिनर्सची RCB च्या फलंदाजांना वेसण घातली आणि रनरेटवर अंकुश लावला. ज्यामुळे RCB च्या काही फलंदाजांनी निव्वळ पॅनिक होऊन मोठे फटके खेळत विकेट फेकल्या. इथे विराटकडून एका संयमी खेळीची गरज होती पण तिकडेही तो अपयशी ठरला.

२) धीर सोडला संघ खचला –

टी-२० क्रिकेटमध्ये काही गोष्टी या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात. विराट कोहली आऊट झाल्यानंतर मॅक्सवेल आणि डिव्हीलियर्स हे दोन बिनीचे शिलेदार RCB कडे होते. परंतू अखेरच्या ओव्हर्समध्ये KKR चा कॅप्टन मॉर्गन हा स्पिनर्सवर भर देतोय, जेणेकरुन १६-१७ व्या षटकापर्यंत KKR च्या स्पिनर्सचा कोटा संपणार आहे याचा अंदाज दोघांनाही यायला हवा होता. झालंही तसंच KKR ने शेवटच्या तीन ओव्हर्स या फास्ट बॉलरकडून टाकून घेतल्या, पण याच मोक्याच्या क्षणांमध्ये फटकेबाजी करण्यासाठी RCB कडे एकही चांगला फलंदाज नव्हता. कारण मधल्या ओव्हर्समध्ये पॅनिक होऊन त्यांनी स्पिनर्सला आपल्या विकेट सोपवल्या होत्या. ज्यामुळे RCB टोटल स्कोअर करताना किमान २०-२५ धावांनी कमी पडली.

३) डिव्हीलियर्सवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहणं आणि त्यातून चुकीची संघनिवड –

मी वर म्हटलं त्याप्रमाणे RCB चा संघ हा विराट आणि एबी डिव्हीलियर्स या दोन खेळाडूंवर आधारित आहे. हे दोन खेळाडू फॉर्मात असले तर हा संघ भल्याभल्यांना झोपवतो. पण यापैकी एकही जर फॉर्मात नसेल तर सगळंच बिघडतं. RCB च्या दुर्दैवाने एबी डिव्हीलियर्स या हंगामात फॉर्मात नाही, त्याच्या कामगिरीत सातत्य राहिलेलं नाही. अशावेळी तुमच्याकडे चांगल्या खेळाडूंचा पर्याय असतानाही तुम्ही एबी वर अवलंबून राहिलात. ज्याचा फटका तुम्हाला बसला.

१५ कोटी रुपये खर्च करुन संघात घेतलेल्या काएल जेमिन्सनचाही संघाने खुबीने वापर केला नाही. ३८ वर्षांच्या डॅनिअल ख्रिश्चनला संघात ऑलराऊंडर म्हणून खेळवण्यापेक्षा जेमिन्सन हा बॉलर म्हणून कधीही चांगला पर्याय ठरला असता. परंतू इथेही RCB ने संघनिवड करताना मोठी चूक केली, ज्याचा फटका त्यांना बसला.

४) सिलॅबस बाहेरचा आलेला प्रश्न आणि डॅनिअल ख्रिश्चनची ती ओव्हर –

KKR ने RCB विरुद्ध सामन्यात सुनील नारायणला बढती देऊन आपला हुकुमाचा एक्का मैदानात उतरवला. सुनील नारायणची ओळख ही अशाच प्रकारच्या धडाकेबाज फलंदाजीसाठीची आहे. अशावेळी डॅनिअल ख्रिश्चनसारख्या बॉलवर विश्वास दाखवण्याची चूक विराटने केली. नारायणनेही ख्रिश्चनच्या एकाच ओव्हरमध्ये ३ सिक्स लगावत सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. संपूर्ण सामन्यात डॅनिअलने १० बॉल टाकून २९ रन्स दिल्या. ख्रिश्चनही हेच १० बॉल संघाला महागात पडले.

दुसरीकडे शाहबाज अहमद सारखा उपयुक्त स्पिनर संघात असतानाही विराटने त्याचा महत्वाच्या क्षणी वापरच केला नाही. त्याचा याआधीचा रेकॉर्ड तपासला तर त्याने RCB ला दोन वेळा मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून दिल्या होत्या. या सामन्यात विराटकडे शाहबाज अहमदचा वापर करण्याची संधी होती पण ती त्याने वापरलीच नाही ज्यामुळे ख्रिश्चनसारख्या बेभरवशी बॉलरवर अवलंबून राहण्याची वेळ RCB वर आली.

मी पुन्हा एकदा सांगतो खेळाडू म्हणून विराट कोहलीचा दर्जा हा कायम वरचाच असेल, पण कर्णधार म्हणून अंगात असणारी गुणवत्ता विराटच्या अंगात नक्कीच नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएल विराटची कॅप्टन्सी ही इतर अनुभवी खेळाडूंच्या टेकूवरच राहिलेली आहे. विराटने या हंगामात संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे प्रयत्न मनापासून केले, यंदा त्याच्याकडे संधीही होती…पण हाय रे दुर्दैव झोळीच दुबळी निघाली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT