Mumbai News: सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेस ट्रेन तब्बल 5 किलो सोन्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी चोरी केलेल्या सोन्याची किंमत जवळपास 5.5 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनासह जीआरपीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
मुंबईच्या गोरेगाव येथील रहिवासी असलेले अभयकुमार जैन त्यांच्या मुलीसोबत सिद्धेश्वर एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी कोच A-1 मधून प्रवास करत होते. तसेच, त्यांची बर्थ क्रमांक 51 आणि 49 होते. त्यांसोबत दोन ट्रॉली बॅग असून त्यातील एका बॅगेत जवळपास 5 किलो सोनं ठेवलं होतं. ही बॅग त्यांनी बर्थखाली लॉक करून सुरक्षितरित्या ठेवली होती.
5 किलो सोनं असलेल्या बॅगेची चोरी
7 डिसेंबर रोजी पहाटे गाडी कल्याणजवळ पोहोचत असताना जैन यांना जाग आली. त्यावेळी त्यांना बर्थखाली ठेवलेली त्यांची बॅग गायब असल्याचं दिसलं. त्यावेळी पीडित जैन यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी लगेच तात्काळ तिकीट निरीक्षक विक्रम मीणा यांच्याशी संपर्क साधला. तसेच रेल्वे पोलिसांना सुद्धा बॅग चोरी झाल्याची माहिती दिली. संबंधित घटना कल्याण परिसरात घडल्याचं लक्षात येताच त्यांना पुढील कारवाईसाठी कल्याण जीआरपीकडे पाठवण्यात आलं. कल्याण जीआरपीने या प्रकरणी चोरीची फिर्याद नोंदवली असून तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा: नवी मुंबई : अंधार पडल्यानंतर सिग्नलवर अश्लील चाळे, पोलिसांनी 10 तृतीयपंथीयांना ताब्यात घेतलं
पोलिसांचा तपास
आता, याप्रकरणी पोलिसांनी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज, कोचमधील प्रवाशांची चौकशी तसेच मधल्या मार्गातील स्थानकांचा तपास सुरु केला आहे. एसी कोचमध्ये, लॉक केलेल्या बॅगेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची चोरी झाल्याने रेल्वेच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी अत्यंत सराईतपणे ही चोरी केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT











