Mumbai News: मुंबई ते पुणे प्रवास आता केवळ अडीच तासात करता येणार असल्याची बातमी समोर आली आहे. प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी, मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत दोन पर्वतांमध्ये देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल बांधला जात आहे. 182 मीटर उंचीच्या या केबल-स्टेड पूलाचं बांधकाम 94 टक्के पूर्ण झाल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)कडून दोन पर्वतांदरम्यान, केबल स्टे ब्रिज बांधलं जात आहे. यामध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचं अंतर 6 किमीने कमी होणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या 182 मीटर उंचीच्या पुलामुळे वाहने एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरापर्यंत 132 मीटर उंचीवरून जाऊ शकतील. कमी झालेल्या अंतरामुळे वाहनचालकांना डोंगरावरून प्रवास करण्याची गरज राहणार नाही.
केबल ब्रिजचं काम अंतिम टप्प्यात
सध्याच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्झिटपासून सिंहगढ इंस्टिट्यूट दरम्यान 19 किमी अंतर आहे. मिसिंग लिंक बांधण्यात येणार असल्यामुळे हे अंतर केवळ 13.3 किमी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रोजेक्टअंतर्गत, दोन टनल आणि दोन केबल ब्रिज बांधले जाणार आहेत. जवळपास 850 मी लांब आणि 26 मी रुंद दोन केबल ब्रिजची निर्मिती दोन टप्प्यांत केली जाणार आहे. MSRDC च्या नुसार, टनलचं काम जवळपास पूर्ण झालं असून केबल ब्रिजचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: Govt Job: फ्रेशर्स उमेदवारांसाठी सरकारी बँकेत काम करण्याची संधी! RBI च्या भरतीसाठी लवकरच करा अर्ज...
उर्वरित काम पुढच्या वर्षात पूर्ण...
एमएसआरडीसीच्या माहितीनुसार, 128 मीटर उंचीचा केबल-स्टेड पूल वांद्रे-वरळी सी लिंकपेक्षा अंदाजे 55 मीटर उंच असेल. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मते, पुलाचे खांब उभारण्यासाठी चार 182 मीटर उंचीच्या टॉवर क्रेनचा वापर केला जात आहे. हा पूल वाऱ्याच्या वेगाचा सामना करण्याच्या दृष्टीने डिझाइन केला आहे. यामुळे वाहने 100 किमी/ताशी वेगाने प्रवास करू शकतील. आता, पुलाचं उर्वरित काम पुढच्या वर्षात पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: मुंबई: सोलापूर–कल्याणदरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये 5 कोटींचे सोने लंपास! प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह...
हा पूल अशा ठिकाणी बांधला जात आहे जिथे सर्व काही हवामानावर अवलंबून असते. उंच आणि डोंगराळ प्रदेशामुळे, जोरदार वारे, पाऊस आणि धुक्यांमुळे पुलाच्या बांधकामात अडचणी उद्भवू शकतात. धुक्यामुळे काही मीटर अंतरावरचं दिसणं शक्य होत नसल्याने कामगार पुन्हा काम सुरू करण्यापूर्वी धुके निघण्याची वाट पाहतात. पावसाळ्यातही पावसामुळे काम जवळजवळ चार महिने थांबलं होतं. या आव्हानांमुळे पूल बांधकामाच्या कामगारांसाठी पुरेशी सुरक्षितता सुनिश्चित करणे कठीण होतं. या कारणांमुळे, प्रोजेक्टचं काम संथ गतीने सुरू आहे.
ADVERTISEMENT











