Mumbai News: 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते रत्नागिरी दरम्यान रो-रो सेवा सुरू होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील जनतेला ही आनंदाची बातमी दिली. मुंबई ते रत्नागिरी हे अंतर पाच तासांत पार करता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. नितेश राणे यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की ‘ही दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रो-रो फेरी सेवा असेल.’ महाराष्ट्रातील लोक बऱ्याच काळापासून या सेवेच्या सुरुवातीची वाट पाहत असून आता पुढील महिन्यातच ही सेवा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा मुंबई आणि कोकणातील लोकांसाठी सोयीस्कर असण्यासोबत पर्यटकांसाठी देखील एका रोमांचक समुद्री प्रवासापेक्षा कमी नसेल. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील भाऊचा धक्का ते रत्नागिरीतील जयगड आणि मुंबई ते सिंधुदुर्गातील विजयदुर्ग अशी रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीनंतर मुंबईहून कोकणात समुद्रमार्गे नवीन वाहतूक उपलब्ध होईल. हवामानातील बदल लक्षात घेता, राज्य सरकारने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. ही सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू होईल. राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून आवश्यक एनओसी मिळाली आहे.
अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
या सेवेचा लाभ घेऊन अनेक प्रवासी प्रवास करू शकतील. रो-रो सेवा मुंबई आणि कोकण दरम्यान गेम चेंजर ठरू शकत असल्याचं अधिकाऱ्यांचं मत आहे. मुंबईतील भाऊचा धक्का ते जयगड पर्यंत तीन तास आणि भाऊचा धक्का ते विजयदुर्ग पर्यंत पाच तास लागतील. येथे जेट्टीची सुविधा आहे. जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बसचीही सोय करण्यात आली आहे.
हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: मुंबईतील बाप्पाच्या दर्शनासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! मध्य रेल्वेवर 'इतक्या' स्पेशल ट्रेन धावणार
किती असेल ‘रो-रो’चा वेग?
राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, रो-रो सेवेचा वेग 25 नॉट्स इतका असेल. अशातच, M2M नावाची रो-रो फेरी ही दक्षिण आशियातील सर्वात वेगवान सेवा असेल. त्यात इकॉनॉमी क्लासमध्ये 552, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 44, बिझनेस क्लासमध्ये 48 आणि फर्स्ट क्लासमध्ये 12 प्रवासी बसू शकतील. याशिवाय, त्यात वाहने वाहून नेण्याची क्षमता देखील असेल.
हे ही वाचा: गणपती मंडपात मृत्यूचा तांडव... चाकूने वार करून तरुणाची हत्या! नेमकं काय घडलं?
किती असेल ‘रो-रो’चे भाडे?
मुंबई ते कोकण या रो-रो फेरी सेवेचं भाडंही जाहीर करण्यात आले आहे. इकॉनॉमी क्लासचे भाडे 2500 रुपये असेल. प्रीमियम इकॉनॉमी क्लासचे भाडे 4000 रुपये, बिझनेस क्लासचे 7500 रुपये तर फर्स्ट क्लासचे भाडे 9000 रुपये असेल. चारचाकी वाहनांसाठी 6000 रुपये, दुचाकींसाठी 1000 रुपये, सायकलसाठी 6000 रुपये आणि मिनी बससाठी 13,000 रुपये भाडे आकारलं जाईल. बसच्या क्षमतेनुसार भाडे वाढेल. मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रस्ते मार्गाने एकूण अंतर 442 किमी आहे. हे अंतर कापण्यासाठी नऊ तास लागतात, तर मुंबई ते रत्नागिरी हे अंतर 326 किमी आहे. हे अंतर कापण्यासाठी साधारणपणे सात तास लागतात.
ADVERTISEMENT
