भिवंडी: भिवंडीचे खासदार बाळ्या मामांच्या मतदारसंघात वाहतूक कोंडीचा कहर पाहायला मिळाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. ठाणे ते भिवंडी बायपासमधील राजनोली नाका परिसरापर्यंत सुमारे 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून हजारो प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकले आहेत. विशेष म्हणजे रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा फटका बसल्याचे दिसून आले.
ADVERTISEMENT
शनिवारी सकाळपासून मुंबई-नाशिक महामार्ग हा मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नाशिकला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावर आधीपासूनच मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहनांची वर्दळ असते. त्यात गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या कार, बस, टॅक्सी आणि इतर वाहनांची भर पडल्याने वाहतूक अक्षरशः ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली. ठाण्यापासून भिवंडी बायपास आणि पुढे राजनोली नाक्याच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी वाहने अत्यंत संथ गतीने पुढे सरकत होती, तर काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र होते.
रुग्णवाहिकाही कोंडीत!
या वाहतूक कोंडीचा सर्वात गंभीर परिणाम आपत्कालीन सेवांवर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या मार्गावरून मुंबई विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. विमानाची वेळ गाठण्यासाठी घरातून लवकर निघालेल्या प्रवाशांना महामार्गावरील लांबच लांब रांगांमध्ये अडकून राहावे लागले.
खासदार बाळ्या मामांच्या मतदारसंघात वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या मतदारसंघातून जाणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुरेसे नियोजन आणि ठोस उपाययोजना झाल्या का ?, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे हजारो प्रवासी तासन्तास कोंडीत अडकले आहेत, तर दुसरीकडे रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे केवळ वाहतूक कोंडी सोडवण्यापुरते नव्हे, तर भविष्यात अशा परिस्थितीत आपत्कालीन वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि प्रभावी वाहतूक नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्षात महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागणार, याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












