छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेशमधील कुबेरेश्वर धाम येथे दर्शन करून परतणाऱ्या दहा जणांच्या रिक्षाला बुधवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जिवलग मैत्रिणींचा जागीच मृत्यू झाला. पहाटे साधारण 4 वाजता पंचवटी चौक ते लोखंडी पूल या रस्त्यावर समोरून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसचे उघडे असलेले लगेज कंपार्टमेंटचे (डिक्की) दार अचानक रिक्षावर येऊन आदळले. त्यानंतर डिक्कीचा दरवाजा थेट रिक्षाच्या आत घुसत मागील सीटवर बसलेल्या चार महिलांवर आपटला. यात लता राजू परदेशी (वय 47) आणि आशा राजू चव्हाण (40, दोघी रा. वाळूज) या दोघींचा गळा चिरल्यासारखा होऊन जागीच मृत्यू झाला. इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. तर चालकासह, समोरील आणि मधल्या सीटवर बसलेल्या तिघींच्या अगदी केसावरून डिक्कीचा दरवाजा गेल्याने त्या थोडक्यात बचावल्या.
ADVERTISEMENT
कुबेरेश्वर धाम हे मध्य प्रदेशातील सिहोर येथे असून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनामुळे हे ठिकाण देशभरातील भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. वाळूज परिसरातील लता आणि आशा या दोघी मैत्रिणी गेल्या दोन महिन्यांपासून सिहोरला दर्शनासाठी जाण्याची योजना करत होत्या. त्यांच्यासोबत मंगल व्हाणे, भारती एकनूरे, सीमा काकडे, अनिता मोतकर, शांता बलेगा, शोभा वाम, तसेच दोन अन्य प्रवासी असे एकूण दहा जण 17 नोव्हेंबरला रेल्वेने सिहोरला रवाना झाले. दर्शनानंतर त्यांपैकी दोघांनी तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला, तर उर्वरित आठ जण भोपाळ, मनमा मार्गे प्रवास करून पहाटे 3 वाजता शहरात परतले.
यांपैकी एका महिलेला श्रीरामपूरला जाण्यासाठी स्टेशनवर उतरवले. उरलेल्या सात महिलांनी एकत्र रिक्षाने वाळूजकडे जाण्याचे ठरवले. मात्र, काही मिनिटांच्या अंतरावरच भीषण घटना घडली. रिक्षा पंचवटी परिसरात आली असता समोरून येणाऱ्या बसची उघडी राहिलेली डिक्की वेगाने उघडली आणि ती थेट रिक्षावर कोसळली. रिक्षाचालकाने मोठ्या प्रयत्नाने वाहन थांबवत स्वतःला सावरले आणि मदतीसाठी ओरडू लागला.
अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांनी तात्काळ धाव घेत 112 वर कॉल केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जखमी महिलांना नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातानंतर बसचालक चेन्नवरी श्रीकांत गुवे (29, रा. बिदर, कर्नाटक) आणि क्लीनर राज सुनील बैरागी (20, रा. मध्य प्रदेश) हे दोघे पळून जाण्याच्या तयारीत असताना आसपासच्या नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या अपघातात मृत झालेल्या दोन्ही महिला अत्यंत जिवलग मैत्रिणी होत्या. त्यांच्या अंत्यसंस्काराची दृष्येही विदारक होती. लता यांच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच आशा यांच्या अंत्ययात्रेचा ताफाही तेथे पोहोचला. लता परदेशी यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून बसचालक आणि क्लीनरवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांनी दिली. धार्मिक यात्रेतून परतताना घडलेल्या या भीषण अपघातामुळे वाळूज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











