Pooja Gaikwad granted bail by Barshi Sessions Court : राज्याभरात चर्चेचा विषय ठरलेल्या माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणात अटक झालेल्या नर्तिका पूजा गायकवाड (रा. सासुरे, ता. बार्शी) हिला बार्शी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 9 सप्टेंबर रोजी लुखामसलाचे (ता. गेवराई) माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी पूजाच्या सासुरे येथील निवासस्थानासमोर स्वतःच्या गाडीत रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून जीव दिला होता. या घटनेनंतर पोलिसांनी पूजाला अटक केली होती.
ADVERTISEMENT
अटकेनंतर तिने आपल्या वतीने अॅड. धनंजय माने यांच्या मार्फत जामीनाची विनंती न्यायालयात दाखल केली होती. सुनावणीदरम्यान अॅड. माने यांनी न्यायालयाला सांगितले की, पूजा गायकवाडला केवळ संशयावरून गुन्ह्यात ओढण्यात आले आहे. मृत व्यक्तीने कोणतीही चिठ्ठी किंवा जबाब सोडलेला नाही. तसेच तपास जवळपास पूर्ण झाला असल्यामुळे आरोपी महिलेला तुरुंगात ठेवून कोणताही उद्देश साध्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूजाच्या बाजूने अॅड. जयदीप माने, अॅड. शरद झालटे आणि अॅड. किरण गवळी यांनीही आपले मुद्दे मांडले.
हेही वाचा : 'यै मुंबई नही, गांधीनगर है, इधर भैयालोग का चालेगा..' राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना परप्रांतियाकडून शिवीगाळ
दरम्यान, या प्रकरणामागील पार्श्वभूमी देखील गंभीर स्वरूपाची आहे. गोविंद बर्गे यांना तमाशा पाहण्याची आवड असल्याने ते विविध कला केंद्रांत जात असत. दीड वर्षांपूर्वी थापडीतांडा येथील कला केंद्रात त्यांची ओळख नर्तकी पूजा गायकवाडशी झाली. ओळखीचं रुपांतर पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधात झालं. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी वारंवार पारगाव कला केंद्रावर जात होते. प्रेमसंबंध दृढ झाल्यानंतर त्यांनी पूजाला सुमारे पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन आणि काही सोन्याचे दागिने दिले. एवढेच नव्हे, तर तिच्या नात्यातील व्यक्तींच्या नावावरही काही मालमत्ता केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
परंतु मागील काही आठवड्यांपासून या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पूजा गायकवाडने अचानक गोविंद यांच्याशी संवाद बंद केला. त्यानंतर तिने गोविंद यांनी गेवराईतील बंगला तिच्या नावावर आणि तिच्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्याची मागणी केली, असे सांगितले जाते. ही मागणी मान्य न झाल्यास गोविंद यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही तिने दिल्याचा दावा समोर आला आहे. या सर्व घटनांमुळे मानसिकरीत्या खचलेल्या गोविंद बर्गे यांना प्रचंड धक्का बसला. प्रेमात झालेल्या निराशा आणि सततच्या तणावामुळे ते खोल नैराश्यात गेले होते. शेवटी या नैराश्याच्याच भरात त्यांनी जीव घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











