डॉक्टर संग्राम पाटलांना लंडनला जाण्यापासून रोखलं, मुंबई विमानतळावर काय घडलं?

Dr. Sangram Patil News : सोशल मीडियावर भाजपविरोधात भूमिका मांडणारे डॉ. संग्राम पाटील काही दिवसांपूर्वी कुटुंबासह भारतात आले होते. मात्र, आता डॉक्टर संग्राम पाटील यांना भारतातून परत जाताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Sangram Patil News

Sangram Patil News

मुंबई तक

19 Jan 2026 (अपडेटेड: 19 Jan 2026, 09:54 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टर संग्राम पाटलांना लंडनला जाण्यापासून रोखलं

point

मुंबई विमानतळावर काय घडलं?

Dr. Sangram Patil News : ब्रिटिश नागरिक आणि NHS UK चे सल्लागार डॉक्टर संग्राम पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर भाजपविरोधात भूमिका मांडणारे डॉ. संग्राम पाटील काही दिवसांपूर्वी कुटुंबासह भारतात आले होते. मात्र, आता डॉक्टर संग्राम पाटील यांना भारतातून परत जाताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  10 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या एका फेसबुक पोस्टच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही कारवाई अटक नसून केवळ चौकशीपुरती असल्याचे गुन्हे शाखेने स्पष्ट केले होते. यानंतर त्यांनी त्याच दिवशी आणि नंतर 16 जानेवारी रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 3 येथे हजर राहून आपली लेखी भूमिका सादर केली होती.

हे वाचलं का?

मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं? 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर संग्राम पाटील यांनी आपण 19 जानेवारी रोजी सकाळी यूकेला परत जाणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले ‘लूक आऊट सर्क्युलर’ (LOC) मागे घेतले जाईल, असे आश्वासन दिल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. 19 जानेवारी रोजी सकाळी 8  वाजताच्या इंडिगो विमानाने लंडनला जाण्यासाठी डॉक्टर संग्राम पाटील मुंबई विमानतळावर पोहोचले. मात्र, इमिग्रेशन काउंटरवर त्यांना थांबवण्यात आले आणि परदेशात जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे डॉक्टर पाटील यांचा परतीचा प्रवास अचानक थांबवण्यात आला. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी शरद धरावे आणि मिलिंद काथे करत असल्याची माहिती आहे. डॉक्टर संग्राम पाटील यांच्याविरोधात सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल असून, त्याच आधारे ‘लूक आऊट सर्क्युलर’ (LOC) जारी करण्यात आले होते.

संग्राम पाटील यांच्याबाबतची तक्रार काय? 

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, ठाणे पश्चिम येथील निखिल शामराव भामरे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. निखिल भामरे हे भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सोशल मीडिया सहसंयोजक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 14 डिसेंबर रोजी ‘शहर विकास आघाडी’ आणि ‘Dr. Sangram Patil’ या फेसबुक अकाउंटवरून काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. या पोस्टमधून राष्ट्रीय नेते आणि भारतीय जनता पार्टीविरोधात अवमानकारक, दिशाभूल करणारा आणि समाजात द्वेष पसरवणारा मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. तसेच एका महिलेसंदर्भात आक्षेपार्ह भाष्य केल्याचाही दावा करण्यात आला होता. या सर्व बाबींच्या आधारे सायबर क्राईम विभागाने गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली होती. दरम्यान, चौकशी पूर्ण करूनही डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आल्याने हा विषय आता अधिक गंभीर बनला असून, या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बीड : घोटाळेबाज कुटे दाम्पत्याला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला दुचाकीस्वारांनी दिली धडक, अपघातात एकाचा दुर्देवी अंत


 

    follow whatsapp