जालना : हाता तोंडाशी आलेला घास पदरात पाडून घेण्यासाठी शेतात राबणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याचा गहू काढण्याच्या मळणी यंत्रात अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हरिभाऊ सुधाकर इंगोले (वय 29 वर्षे) असे या दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. हरिभाऊ हे विठ्ठलनगर वस्ती येथील आपल्या शेतात गहू काढणीच्या कामासाठी गेले होते. सोबत ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र घेऊन ते काम करत होते. गहू काढण्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक अनवधानाने हरिभाऊ चालू असलेल्या मळणी यंत्राच्या कचाट्यात सापडले आणि यंत्राच्या आत खेचले गेले.
हेही वाचा : T-20 World Cup: टीम इंडियाचा नवा हिरो... सलग दोन Half Century ठोकणारा संजू सॅमसन आहे तरी कोण?
जागीच झाला मृत्यू
यंत्रात ओढले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतःला बाहेर काढण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, मळणी यंत्राचा वेग प्रचंड असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी तातडीने धाव घेत मळणी यंत्र बंद केले. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या भीषण अपघातात हरिभाऊ यांच्या कमरेपासून वरच्या भागाला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
परिसरात हळहळ आणि पोलीस तपास
घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, घनसावंगी येथे हलविला. या प्रकरणी सध्या घनसावंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
एक कष्टाळू तरुण हरपला
मयत हरिभाऊ इंगोले हे केवळ एक शेतकरी नव्हते, तर ते शेतकरी चळवळीशी देखील सक्रियपणे निगडित होते. अत्यंत मेहनती आणि मनमिळावू तरुण म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. ऐन उभारीच्या काळात एका तरुण शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने रामगव्हाण आणि विठ्ठलनगर परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











