'कॉलेजचे 7 हजार विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह', हा दावा अन् सगळेच हादरले.. सरकारकडून स्पष्टीकरण जारी

मुंबई तक

• 07:12 PM • 30 Jul 2026

कर्नाटकातील तब्बल 7 विद्यार्थ्यांना HIV झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्याबाबत आता कर्नाटक सरकारने या प्रकरणी नेमकं सत्य सांगितलं आहे.

claim of 7000 college students hiv positive is fake karnataka government clarifies and warns of action against those spreading rumors

प्रातिनिधिक फोटो

Google CTA

बंगळुरू: कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या तब्बल 7 हजार विद्यार्थ्यांची HIV चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचा दावा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. सोशल मीडियावर असाही दावा करण्यात आला आहे की, सरकारने सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी HIV चाचणी अनिवार्य केली आहे. दरम्यान, या बातमीमुळे पालक आणि सामान्य जनतेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या सगळ्या प्रकारामुळे कर्नाटक सरकारचेही अक्षरश: धाबे दणाणले.

हे वाचलं का?

सोशल मीडियावरील या दाव्याने जनतेमध्ये घबराट पसरल्याचं लक्षात आल्यानंतर कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेने (KSAPS) आता या प्रकरणी स्पष्टीकरण जारी केले आहे. KSAPS चे प्रकल्प संचालक आणि IAS अधिकारी पद्मा बसवंतप्पा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सोशल मीडियावर पसरवले जाणारे हे सर्व दावे पूर्णपणे खोटे, बनावट आणि दिशाभूल करणारे आहेत. KSAPS ने स्पष्टपणे इशारा दिला आहे की, अशा खोट्या अफवा पसरवून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

नेमकं सत्य काय?

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, वैद्यकीय विभाग HIV रुग्ण विद्यार्थी, गृहिणी किंवा विशिष्ट व्यवसायात गुंतलेले आहेत की नाही, यावर आधारित माहिती कधीही संकलित करत नाही. त्यामुळे, 7 हजार विद्यार्थी संक्रमित झाल्याचा आकडा पूर्णपणे खोटा आहे.

हे ही वाचा>> मैत्रिणीच्या पार्टीत महिलेवर लैंगिक अत्याचार, एक्स बॉयफ्रेंडकडून 'तसले' व्हिडिओ शेअर करण्याची धमकी

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2004 पासून कर्नाटकात 18 ते 35 वयोगटातील एकूण अंदाजे 39,000 लोकांची HIV चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये केवळ विद्यार्थीच नव्हे, तर सर्व स्तरांतील लोकांचा समावेश आहे. कायदेशीररित्या, कोणालाही HIV चाचणी करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.

KSAPS च्या प्रकल्प संचालकांनी सांगितले की, HIV आणि एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, 2017 नुसार, रुग्णाच्या संमतीशिवाय आणि लेखी परवानगीशिवाय चाचणी किंवा उपचार सुरू करणे बेकायदेशीर आहे. सरकार केवळ महाविद्यालये किंवा कंपन्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवत आहे. कोणतीही सक्ती केली जात नाही. वैद्यकीय विभागाच्या मते, कर्नाटकात दरवर्षी अंदाजे 11,000 ते 12,000 नवीन HIV रुग्णांची नोंद होते. डेटिंग ॲप्सचा वाढता वापर आणि अनोळखी व्यक्तींसोबतचे असुरक्षित संबंध यामुळे संक्रमित व्यक्तींना शोधणे अधिकाधिक कठीण झाले आहे. राज्यात अंदाजे 56,000 लोक असे असू शकतात ज्यांना त्यांच्या HIV संसर्गाची जाणीव नाही.

हे ही वाचा>> बायकोची हत्या करत भांगेत भरलं सिंदुर, नवरा पंख्याला लटकला

IAS अधिकारी पद्मा बसवंतप्पा म्हणाल्या की, सरकार अंदाजे 23,000 लोकांना मोफत उपचार देत आहे, ही दिलासादायक बाब आहे. चांगली बातमी ही आहे की, उपचार घेणाऱ्यांपैकी 96% लोकांच्या शरीरातील विषाणू पूर्णपणे नियंत्रणात आला आहे, ज्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका नगण्य झाला आहे.

वैद्यकीय विभागाने लोकांना निर्भयपणे 'ब्रेक फ्री' ॲप वापरण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही फक्त सात सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन स्वतःची चाचणी करू शकता. यामध्ये तुमचे नाव किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती विचारली जात नाही.