Maharashtra Weather Report : महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत पाऊस आणि मेघगर्जनेसह सरींचा अंदाज आहे. मराठवाड्याच्या आसपास चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत जाणवण्याची शक्यता आहे. तसेच थायलंडजवळ तयार झालेले चक्राकार वारे पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यातून बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण तयार होऊन भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: घरातील एकाच व्यक्तीला सगळे आर्थिक व्यवहार माहीत असणं योग्य की अयोग्य?
राजस्थानमध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता सौराष्ट्राच्या आसपास पोहोचले आहे. अरबी समुद्रातून मिळणारी आर्द्रता हे क्षेत्र खेचून घेत असल्याने कोकणातील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्याच्या आसपास चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. या हवामान प्रणालीला अपर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन असे म्हटले जात आहे. मराठवाड्यापासून म्यानमारपर्यंत कमी दाबाचा पट्टाही तयार झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काही दिवसांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
21 ते 29 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची शक्यता
21 ते 28 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसासाठी पोषक स्थिती राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये कोकणासोबतच मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील भागांचाही समावेश आहे. 21 ते 29 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता अधिक असल्याचे नकाशावरून दिसत आहे. या काळातील पाऊस काही भागांना दिलासा देणारा ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : शिवसेना सुनावणी : शिंदे गटाकडून बहुमताचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय घडतंय? LIVE अपडेट्स
मराठवाड्यासह अनेक भागांत पावसाचा अंदाज
दरम्यान, 18 सप्टेंबरला नाशिकचा घाट परिसर, नंदुरबार, धुळे, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागांत पाऊस किंवा ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. 19 सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसह धुळे, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या सरी आणि मेघगर्जनेसह वातावरण राहू शकते. 20 सप्टेंबरला नांदेड आणि हिंगोलीला यलो अलर्ट असून मध्यम पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरलाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगर, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नाशिकचा घाट परिसर, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाची शक्यता आहे. 21 सप्टेंबरला सातारा, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, पुणे, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि नाशिकच्या घाट परिसरात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT












