नाशिक : कुत्र्यांना पोत्यात घालून आणलं अन् मुख्याधिकाऱ्याच्या टेबलवर सोडलं! VIDEO

मुंबई तक

17 Sep 2026 (अपडेटेड: 17 Sep 2026, 02:03 PM)

Niphad Stray Dog Protest : निफाडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. विक्रम रंधावे यांनी झोळीत कुत्रा आणून मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडला आणि नोटांची माळ घालून प्रशासनावर सवाल उपस्थित केले.

Niphad Stray Dog Protest

Niphad Stray Dog Protest

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नाशिक : कुत्र्यांना पोत्यात घालून आणलं अन्

point

मुख्याधिकाऱ्याच्या टेबलवर सोडलं! VIDEO

Niphad Stray Dog Protest : नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा नेते विक्रम रंधावे झोळीत भटक्या कुत्र्यांना घेऊन नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले. कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी झोळी उघडून कुत्र्याला थेट मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडलं. यावेळी उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. या आंदोलनातून भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हे वाचलं का?

हेही वाचा : सांगली पटवर्धन घराण्याच्या वारशाचा वाद पेटला, मैनै प्यार किया फेम भाग्यश्रीने काय केलं?

भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप

रंधावे यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. निफाड शहर आणि आसपासच्या परिसरात लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. वाहनचालकांनाही आवारा कुत्र्यांमुळे भीतीच्या वातावरणात रस्त्यावरून जावं लागत असल्याचा दावा करण्यात आला. अनेक नागरिकांना आवारा कुत्र्यांनी चावा घेतल्याचाही दावा रंधावे यांनी केला. या समस्येबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असून नगरपंचायतीला लेखी निवेदनही देण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र, समस्या कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला.

हेही वाचा : Astrology : सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्मिती, 'या' राशींचा आजचा दिवस शुभ

मुख्याधिकाऱ्यांना नोटांची माळ घालून प्रशासनावर सवाल

कुत्र्याला मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांना नोटांची माळ घातली. या माध्यमातून नगरपंचायतीच्या कामकाजावर टीका करण्यात आली. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही सवाल उपस्थित करण्यात आले. केवळ तक्रारी नोंदवून उपयोग नाही, तर भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई करण्याची गरज असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या काळातही भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा रंधावे यांनी केला. गणेश मंडळांपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना भीती वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. नगरपंचायतीने तातडीने नसबंदी मोहीम सुरू करावी, आवारा कुत्र्यांना पकडण्यासाठी व्यवस्था करावी आणि या समस्येवर नियंत्रण आणावं, अशी मागणी करण्यात आली.

विक्रम रंधावे यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्यावर थेट सवाल उपस्थित केले. गेल्या अनेक दिवसांपासून आवारा कुत्र्यांचा मुद्दा मांडत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ दिखाऊ कारवाई केली जात असल्याचंही रंधावे यांनी म्हटलं. नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी टेंडरच्या कामांवर अधिक भर दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाने लवकर कारवाई केली नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रंधावे यांनी दिला. गरज पडल्यास नागरिकांच्या उपस्थितीत पुन्हा मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात भटके कुत्रे आणले जातील, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, झोळीत भटका कुत्रा घेऊन कार्यालयात जाण्याचा आणि तो मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.