वेदर रिपोर्ट : परतीच्या पावसाबद्दल काय म्हणालं हवामान खातं?

मुंबई तक

• 09:24 AM • 15 Sep 2026

महाराष्ट्रात सध्या पुन्हा पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाकडून राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे? कुठे मुसळधार पावसाचा इशारा आहे? आणि पावसाचा जोर किती राहणार?

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

परतीच्या पावसाबद्दल काय म्हणालं हवामान खातं?

point

कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता?

Maharashtra Weather : हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रात कुठेही मुसळधार पावसाचा मोठा इशारा किंवा अलर्ट देण्यात आलेला नाही. सध्या राजस्थानजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून तेथे अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे, तर गुजरात आणि महाराष्ट्रात त्याचे काही पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येऊन-जाण्याची शक्यता आहे. बीड, जालना, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

दुष्काळसदृश परिस्थिती

महाराष्ट्रातील मान्सूनच्या एकूण परिस्थितीचा विचार करता अनेक भागांत सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. बीडमध्ये 49 टक्के, जालन्यात 46 टक्के, धाराशिवमध्ये 43 टक्के आणि परभणीमध्ये 42 टक्के कमी पाऊस झाला असून, यामुळे मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे व पिके सुकू लागली आहेत. दुसरीकडे नाशिक, पालघर आणि पुणे या भागांत सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला असला तरी, उर्वरित बहुतांश महाराष्ट्राला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

हे ही वाचा : मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले, एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका

परतीचा मान्सून कधी?

परतीच्या पावसाबाबत हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. राजस्थानमधून साधारण 19 सप्टेंबरच्या सुमारास मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असून, त्यानंतर हळूहळू त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येईल. मान्सून ट्रफची सध्याची दिशा नलिया, राजस्थानमधील कमी दाबाचे क्षेत्र, रायगड, पेंड्रा रोड, दामोह, रुरकेला आणि दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेली आहे. राजस्थानमधील हे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे सरकल्यास महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढू शकतो.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पाऊस सक्रिय, कुठे मध्यम तर... IMD चा अलर्ट

20 सप्टेंबरनंतर दिलासा

राज्यात पावसाच्या पुढील टप्प्याबाबत हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 23 सप्टेंबरच्या सुमारास महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत हवामान मुख्यतः हलक्या सरींचे आणि ढगाळ राहील, परंतु 20 सप्टेंबरनंतर शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.