नागपूर : बेदरकारपणे कार चालवली, 7 जणांना उडवलं; महिला मद्यधुंद असल्याचा संशय

योगेश पांडे

16 Sep 2026 (अपडेटेड: 16 Sep 2026, 11:21 AM)

Nagpur Accident News : नागपुरात भरधाव कारने तीन लहान मुलांसह सात जणांना धडक दिली. महिला चालक मद्यधुंद असल्याची शक्यता असून, संतप्त जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला.

Nagpur Accident News

Nagpur Accident News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नागपूर : बेदरकारपणे कार चालवली

point

7 जणांना उडवलं; महिला मद्यधुंद असल्याचा संशय

Nagpur Accident News : नागपुरात मंगळवारी रात्री भरधाव कारने सात जणांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तीन लहान मुलांसह एकूण 7 जण जखमी झाले आहेत. गोरेवाडा येथील दिनशॉ फॅक्टरीजवळ हा अपघात झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून संबंधित पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि महिला चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

हे वाचलं का?

महिलेने भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दिनशॉ फॅक्टरीजवळ सेल्टॉस कार चालवणाऱ्या महिलेने भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप आहे. सुरुवातीला या कारने बालू कुलमेथे यांच्या एसयूव्हीला धडक दिली. त्यावेळी बालू हे आपल्या मुलीसोबत कारमधून खाली उतरत होते. त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने महिलेच्या कारने तीन मुलांना धडक दिली. या अपघातात रस्त्याने जाणारे हरीश रामभाऊ रेवतकर आणि आशीष नखाते हे देखील जखमी झाले. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली.

अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

या अपघातात तीन लहान मुलांसह एकूण सात जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमींमध्ये हरीश रामभाऊ रेवतकर, आशीष नखाते, बालू कुलमेथे आणि त्यांच्या मुलीचा समावेश आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. महिला चालकाविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जमावाकडून करण्यात आली. अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महिला चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तिचा रक्ताचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. महिलेला ताब्यात घेऊन पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. अपघाताच्या वेळी कारमध्ये आणखी कोण कोण होते, याबाबतही तपास सुरू आहे. घटनास्थळाच्या आसपास असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या प्रकरणात नागपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.