Gadchiroli Crime News : क्षुल्लक बाबीचा राग मनात ठेवून तरुणाने आपल्या वडिलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. आरमोरी-पालोरा मार्गावर रविवारी (ता. 12) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण तालुका हादरला. देवाजी आडकू धकाते (वय 65, रा. ताडूरवारनगर, आरमोरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी योगेश देवाजी धकाते (25) यास अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी सांगितले की, देवाजी धकाते यांचा पालोरा गावाजवळ वीटभट्टीचा व्यवसाय आहे. त्यांना पाच मुली व योगेश नामक मुलगा आहे. सर्व मुलींचे आधीच विवाह झाले आहेत. वर्षभरापूर्वी देवाजींनी योगेशचेही लग्न लावून दिले. योगेश हा पत्नीसह आपल्या आई-वडिलांकडेच राहायचा. दोघेही पिता-पुत्र दररोज वीटभट्टीवर जायचे. तेथे दिवसभर कष्ट केल्यानंतर संध्याकाळी आरमोरीला परत यायचे. देवाजी धकाते हे योगेशच्या पत्नीला रागावत असत. शिवाय गर्भवती असतानाही तिला कामे करण्यास सांगत. ही बाब योगेशला आवडत नव्हती. त्यामुळे पिता-पुत्रांमध्ये अधूनमधून वाद होत होता. राग मनात ठेवून योगेशने वडिलांना संपविण्याचा विडा उचलला.
असा केला खून
रविवारी संध्याकाळी वीटभट्टीवरून वडील निघण्यापूर्वीच योगेश घराकडे परत जायला लागला. पालोरा गावाजवळच्या निर्जनस्थळी योगेश दबा धरून होता. साडेसात वाजताच्या सुमारास वडील देवाजी मुलीशी फोनवर बोलत-बोलत येत होते. देवाजी दिसताच योगेशने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केला. त्यांच्या किंकाळ्या मुलीने ऐकल्या. मात्र, संवाद बंद झाला. त्यामुळे मुलीला काहीतरी विपरीत घडल्याची शंका आली. तिने तत्काळ शेजारी नागरिकांना माहिती दिली.
मुलाची संशयास्पद हालचाल
योगेशने वडिलांना संपविल्यानंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड पाण्याने धुवून जणू काही घडलेच नाही, अशा आविर्भावात घर गाठले. त्यानंतर तो आई, चुलतभाऊ व अन्य मंडळींसोबत वडिलांना शोधण्यासाठी निघाला. अखेर बोगद्याजवळ देवाजींचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. नागरिकांनीही मोठी गर्दी केली. सुरुवातीला वाघाने देवाजींना ठार केल्याची चर्चा झाली. परंतु पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. योगेशच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी प्रथम त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. अखेर त्याने वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.
ADVERTISEMENT











