'सुरांची बाग उजाड झाली..' आशा भोसले यांच्या निधनाने फडणवीस भावूक; शरद पवारांसह अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आशाताईंच्या जाण्याने भावूक झाले आहेत. आशा भोसले यांच्या जाण्याने सुरांची बाग उजाड झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Fadnavis on death of Asha Bhosale

Fadnavis on death of Asha Bhosale

मुंबई तक

12 Apr 2026 (अपडेटेड: 12 Apr 2026, 02:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुरांची बाग उजाड झाली..

point

आशा भोसले यांच्या निधनाने फडणवीस भावूक

point

रोहित पवारांनीही व्यक्त केला शोक

Fadnavis on death of Asha Bhosale : भारतीय संगीतविश्वातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने फक्त भारतीय संगीतविश्वातूनच नव्हे तर राजकीय, सामाजिक स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आशाताईंच्या जाण्याने भावूक झाले आहेत. आशा भोसले यांच्या जाण्याने सुरांची बाग उजाड झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस भावूक

आशा भोसले यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.

आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति

हे ही वाचा : भारतीय संगीतातील तेजस्वी तारा निखळला, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना

शरद पवार म्हणाले की, आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

हे ही वाचा : 'महिला म्हणून मी जबाबदारी पार पाडू शकेन की नाही? अनेकांना संशय होता..', सुनेत्रा पवार भाषणात काय म्हणाल्या?

नितीन गडकरीही भावूक

गडकरी म्हणाले, भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व, गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. त्यांचे जाणे ही भारताच्या संगीत क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी आहे.

आपल्या विलक्षण प्रतिभेने आशाजींनी संगीत क्षितिजावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. 'नया दौर', 'तिसरी मंझिल', 'हरे रामा हरे कृष्णा', 'उमराव जान' यांसारख्या चित्रपटांसोबतच 'इजाज़त' आणि 'रंगीला' सारख्या काळानुसार आणि पिढ्यांनुसार बदलणाऱ्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतील गीतांना आशाजींनी आपल्या स्वरांनी अजरामर केले आहे. पार्श्वगायिका म्हणूनही त्यांनी अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत.

संगीत क्षेत्रातील त्यांचा 'स्वर' आणि त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
 

रोहित पवार यांनीही व्यक्त केल्या भावना

आशा भोसले यांच्या निधनावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आपला शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, गेल्या सहा दशकांहून अधिक काळ भारतीय संगीत विश्वावर आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (९२) यांचं निधन झाल्याचं वृत्त अतिशय दुःखद आणि मनाला चटका लावणारं आहे. भारतीय संगीत विश्वावर त्यांनी उमटवलेला अमीट ठसा कायम अजरामर आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि देशातील संगीतावर प्रेम करणारा प्रत्येकजण धक्क्यात आहे. त्यांच्यासह भोसले कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना!
आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!