Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी परिसरात सज्ञान वयाच्या तरुण-तरुणीने परस्पर संमतीने प्रेमविवाह केला. कुटुंबीयांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे नवदाम्पत्य संरक्षणासाठी शहापूर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, मंगळवारी रात्री अचानक पोलिस ठाण्याच्या आवारातच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मुलीच्या नातेवाईकांनी नवविवाहित जोडप्याला पाहताच संताप व्यक्त करत थेट नवऱ्यावर हल्ला चढवला आणि जोरदार आरडाओरड केली. या अनपेक्षित घटनेमुळे पोलिस ठाण्याच्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली आणि पुढील अनर्थ टाळला.
ADVERTISEMENT
शहापूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील तरुणाची ओळख कोल्हापूर शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तरुणीशी झाली होती. काही महिन्यांच्या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, घरच्यांचा विरोध असल्याने दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विवाह केला आणि मंगळवारी थेट पोलिस ठाण्यात जाऊन संरक्षणाची मागणी केली. मंगळवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास हे जोडपे शहापूर पोलिस ठाण्यात आले आणि घडलेला प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान, दोघे पोलिस ठाण्यात आल्याची माहिती मिळताच मुलीचे नातेवाईक चिडले आणि काही वेळातच पोलिस ठाण्यात पोहोचले.
हेही वाचा : पुण्यात कोचिंग सेंटरमध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याकडून मित्रावर चाकूने वार करत संपवलं, शिक्षकासमोर भयंकर घडलं
ओरडाआरड, मारहाण आणि पोलिसांची धावपळ
पोलिस ठाण्याच्या आवारातच नातेवाईकांनी संतप्त होऊन नवविवाहित तरुणाला धमकावले तसेच नवऱ्यावर हात उचलला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावले. उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक अविनाश मुंगसे, पोलिस नाईक संतोष कांबळे, अभिजित तेलंग आणि आरिफ वडगावे यांनी तत्काळ मध्यस्थी करत हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी मुलीचे नातेवाईक तिला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी त्यांना रोखून सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर सर्वांची सविस्तर चौकशी करून परिस्थिती निवळवण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या संयम आणि जलद कारवाईमुळे कोणतीही गंभीर घटना घडली नाही. प्रेमविवाहाशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांनी दोन्ही बाजू समजून घेत समेटाचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या आवारातच असा गोंधळ आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी, पोलिसांकडून मोठ्या हालचाली, कोणत्याही क्षणी अटक होणार
ADVERTISEMENT











