अंबाजोगाई : नृत्य आणि गायनाची आवड जोपासणाऱ्या एका तरुणीला कलाकेंद्रात काम देण्याचे तसेच चांगले उत्पन्न मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंबाजोगाई येथे बोलावण्यात आले. मात्र, येथे तिच्यावर अत्यंत अमानुष पद्धतीने सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, बारामती तालुक्यात राहणारी पीडित तरुणी नृत्य व गायनाची आवड जोपासत होती. तिच्या या कलेच्या जोरावर काहीतरी पुढे करण्याची तिची इच्छा होती. याच पार्श्वभूमीवर 24 एप्रिल 2025 रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने पीडितेच्या आईशी संपर्क साधला. आपल्या कलाकेंद्रात नृत्य करणाऱ्या मुलींची आवश्यकता असल्याचे सांगत, मुलीला अंबाजोगाईला पाठविल्यास तिला नृत्याचे प्रशिक्षण मिळेल आणि त्याबदल्यात पैसेही दिले जातील, असे आश्वासन तिने दिले.
हेही वाचा : महिलेसोबत हॉटेलमध्ये शरीरसंबंध, नंतर प्रेयसीकडून लग्नाची मागणी अन् वाद, प्रियकराचं गुप्तांग छाटून...
या आमिषाला बळी पडून पीडित तरुणीला अंबाजोगाई येथे आणण्यात आले. तिला ‘पायल कलाकेंद्र’ या ठिकाणी नेण्यात आले असता, तिथली परिस्थिती संशयास्पद वाटल्याने तिने तेथे राहण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या बदामबाई गोकुळ आणि तिच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी तरुणीला बेदम मारहाण केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाईतील साई लॉजवर नेण्यात आले. तेथे बदामबाईने तरुणीला मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात देऊन स्वतः तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. लॉजवर या तिघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला आणि तिचे शारीरिक व मानसिक छळ केला, असा गंभीर आरोप आहे.
या अमानुष प्रकारानंतर पीडितेला पुन्हा पायल कलाकेंद्र येथे आणून सोडण्यात आले. त्यानंतर तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचाही प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कसेबसे या नरकातून सुटका करून घेत पीडितेने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला, त्यानंतर तिच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











