वाशिम- जका खान: वाशिम जिल्ह्यात काल (15 डिसेंबर) रात्री एक भयानक घटना उघडकीस आली. रस्त्यावर मागची काच तुटलेली एक कार उभी होती. रिसोड शहर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि ते लगेच तिथे पोहोचले, श्वान पथकालाही तिथे बोलवण्यात आलं. काही वेळातच, ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पोहोचली. काहींना वाटलं की हा अपघात आहे, काहींना वाटलं की हा दरोडा आहे तर हे मारहाणीचं प्रकरण असल्याचा देखील अनेकांनी अंदाज बांधला. मात्र, सत्य वेगळंच होतं. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
3 संशयास्पद वाहनांची माहिती
पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, सकाळी रस्त्यावर आढळलेल्या कारवर 10 ते 12 जणांनी हल्ला केला होता आणि त्यांनी पीडितांकडून 12 ते 15 हजार रुपये घेऊन फरार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान, 3 संशयास्पद वाहनांची माहिती मिळाली. याशिवाय, आणखी माहिती मिळाली की या तीन गाड्यांमधून काही लोक आले होते आणि त्यांनी आसेगाव पेण नावाच्या गावात एका घरात हल्ला केला होता. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत, ज्या घरात लोकांना मारहाण करण्यात आली होती तिथे फ्रॉड म्हणजेच खोटं लग्न झाल्याचं आढळून आले.
खोटं लग्न अन् फसवणूकीचं प्रकरण...
लग्न झालेल्या तरुणीने आपली फसवणूक केल्याची जाणीव पीडित तरुणाला झाली आणि संबंधित तरुणाला ती घरातून पळून जाणार असल्याची भनक देखील लागली होती. 14 डिसेंबर रोजी सकाळी, तीन गाड्यांमधून 10 ते 12 लोक तरुणाच्या घरी गेले. मात्र, तेव्हा त्याच टोळीत सहभागी असलेली नवरी त्यांना सापडली नाही. त्यावेळी त्यांनी वराच्या म्हणजेच त्या तरुणाच्या वडिलांचं अपहरण केलं आणि त्यांना सोबत घेऊन गेले. आरोपी टोळीने पीडित दीपक खंजोरला बोलवून मुलगी म्हणजेच आरोपी वधू परत करून त्याच्या वडिलांना सोबत घेऊन जाण्यास सांगितलं. इतकंच नव्हे तर, मुलगी परत न केल्यास वडिलांना मारून टाकण्याची देखील धमकी त्यांनी दिली.
हे ही वाचा: लातूर : 1 कोटीच्या विम्यासाठी लिफ्ट मागणाऱ्याला कारमध्ये जिवंत जाळलं, अर्धी हाडं उरली, आरोपीला अटक
काहीही संबंध नसताना पीडितांवर हल्ला
रात्री आरोपी त्यांच्या गाडीतून परतत असताना एक कार त्यांचा पाठलाग करत असल्याचं त्यांना वाटलं. आरोपींनी ती कार थांबवली आणि त्यात बसलेल्या लोकांना मारहाण केली. पीडितांकडून त्यांनी 12 ते 15 हजार रुपये हिसकावून घेतले आणि गाडीची तोडफोडही केली. ही घटना आरोपींच्या संशयातून घडली असून आरोपींनी तोडफोड केलेली गाडी नांदेडची होती आणि त्यात बसलेल्या प्रवाशांचा आरोपी आणि पीडित वराशी काहीही संबंध नव्हता.
हे ही वाचा: कोल्हापूर : वनतारात नेलेल्या माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग मोकळा, मुंबईत मोठ्या घडामोडी
वाशिम पोलिसांनी cctv आणि CDR च्या मदतीने तीन गाड्यांपैकी एक गाडी ट्रेस केलं आणि त्याचं लोकेशन अहिल्यानगर येथे सापडलं. त्यानंतर, अहिल्यानगरच्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून त्यांना वाशिम येथे नेण्यात आलं. आता, आरोपी महिलेसह तिच्या 5 साथीदारांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











