विकास राजूरकर, चंद्रपूर: चंद्रपूरच्या शेतकऱ्यानं कंबोडियाला जाऊन किडनी विकली. सावकाराचं एक लाखाचं कर्ज ७४ लाखांवर गेलं. होत नव्हतं सगळं गेलं. सावकाऱाच्या सल्ल्यानंच किडणी विकली. हे कुठं घडलंय तर आपल्या महाराष्ट्रात. जिथं शेतकऱ्यांसाठी अनेक हजार कोटींची गलेलठ्ठ पॅकेजेस सत्ताधारी घोषित करतात.
ADVERTISEMENT
हादरवून टाकणारी कहाणी जशीच्या तशी
होय ही अंगावर काटा आणणरी घटना घडलीय चंद्रपूरमध्ये. जिथून जवळच राज्याचे मुख्यमंत्री राहतात. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातलं मिंथूर गाव. या गावातील रोशन कुडे नावाचे हे शेतकरी. बेकायदेशीर सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी या शेतकऱ्याने आपली किडनी ₹८ लाखांना विकल्याचा दावा केलाय.
सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी त्याची किडनी विकावी लागली. आता रोशन या सावकारांच्या जाळ्यात कसे अडकले बघा. ज्यामुळं त्यांना किडनी विकावी लागलीय.
रोशनकडे चार एकर शेती आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीवर अवलंबून आहे. शेती फायदेशीर ठरली नाही. म्हणून, त्याने एक साईड बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुग्धव्यवसायातून काही उत्पन्न मिळवण्यासाठी, त्याने दुधाळ गायी खरेदी केल्या. त्याने दोन सावकारांकडून प्रत्येकी ५०,००० रुपये उधार घेतले. येथेही नशीब त्याच्या बाजूने नव्हते. गायी मेल्या. पिके बुडाली. कर्जाचा ढीग झाला.
सावकार त्याच्या घरी आले आणि त्यांना जे काही देता येईल ते त्यांना दिलं. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने दोन एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले. पण कर्ज परतफेड झाली नाही. वेळेवर कर्ज न फेडल्याबद्दल सावकारांनी दररोज १०,००० रुपये व्याज आकारण्याची धमकी दिली, म्हणूनच एक लाख रुपयांचे कर्ज ७४ लाख रुपयांवर पोहोचले.
जेव्हा सर्व काही विकूनही पैसे मिळाले नाहीत, तेव्हा शेवटी एका सावकाराने त्याला त्याची किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडेंना कलकत्ता येथे नेले. कुडेची वैद्यकीय तपासणी झाली. चाचण्यांनंतर, त्याची कंबोडियात शस्त्रक्रिया झाली आणि त्याची किडनी काढून टाकण्यात आली. कुडे यांनी ही किडनी आठ लाख रुपयांना विकली.
आता रोशन या प्रकरणात पोलीस स्टेशनला पोहोचल्याची माहिती आहे. चौकशी होईल, गुन्हे दाखल होतील, आरोपी पकडले जातील, नंतर सुटतीलही, मात्र बळीराजावर आलेलं हे दुष्टचक्र कधी थांबणार आणि अशा संतापजनक प्रकरणांवर आळा कसा बसणार असे अनेक सवाल अनुत्तरीत आहेत.
ADVERTISEMENT











