मुंबई : मोबदला मिळेना, वकिलाकडूनही फसवणूक, प्रकल्पग्रस्ताने हायकोर्टासमोर जाळून घेतलं, 60 टक्के भाजल्यानंतर..

Mumbai Crime News : न्यायासाठी दरवाजे ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याची भावना बळावल्याने सावंत यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे वारंवार तक्रारी केल्या. उपलब्ध माहितीनुसार, 2023 पासून त्यांनी तब्बल 18 वेळा मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला होता

High Court

High Court

मुंबई तक

16 Dec 2025 (अपडेटेड: 16 Dec 2025, 09:59 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : मोबदला मिळेना, वकिलाकडूनही फसवणूक,

point

प्रकल्पग्रस्ताने हायकोर्टासमोर जाळून घेतलं, 60 टक्के भाजल्यानंतर..

मुंबई : शासकीय प्रकल्पासाठी अधिग्रहित झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, तसेच न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली झालेल्या कथित फसवणुकीमुळे आलेल्या मानसिक तणावातून विरारमध्ये वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीने सोमवारी दुपारी उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारात प्रकाश सावंत (वय 45) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या शरीराचा मोठा भाग भाजला आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील जी. टी. रुग्णालयात अतिदक्षता उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

प्रकाश सावंत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे रहिवासी असून, रोजगाराच्या निमित्ताने ते सध्या विरार येथे वास्तव्य करत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मालकीच्या जमिनीचा एक भाग मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आला. मात्र, या जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या मोबदल्याबाबत समाधानकारक निर्णय न झाल्याने सावंत हे दीर्घकाळापासून संघर्ष करत होते. विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारूनही प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचं विचित्र कृत्य, भर कार्यक्रमात नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा हिजाबच खेचला अन्…

या प्रक्रियेत त्यांचा संपर्क एका महिला वकिलाशी आला. न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत संबंधित वकिलाने सावंत यांच्याकडून सुमारे 6 लाख 80 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, अपेक्षित काम न झाल्याने आणि संशय वाढल्यानंतर सावंत यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर संबंधित वकिलाने त्यातील सुमारे सहा लाख रुपये परत केल्याची माहिती आहे. तरीही उर्वरित रक्कम आणि झालेल्या मानसिक त्रासामुळे सावंत यांची परिस्थिती अधिकच बिकट होत गेली.

न्यायासाठी दरवाजे ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याची भावना बळावल्याने सावंत यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे वारंवार तक्रारी केल्या. उपलब्ध माहितीनुसार, 2023 पासून त्यांनी तब्बल 18 वेळा मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला होता. याशिवाय महसूल विभाग, कोकण विभागीय कार्यालय तसेच पंतप्रधान कार्यालयाकडेही त्यांनी लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही प्रश्न मार्गी न लागल्याने ते प्रचंड नैराश्यात गेले होते.

या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेनंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सावंत यांच्या शरीराचा सुमारे 60 टक्के भाग भाजला असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे शासकीय प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या नागरिकांच्या मोबदल्याच्या प्रश्नांवर आणि कायदेशीर प्रक्रियेत होणाऱ्या फसवणुकीवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून, सावंत यांच्या तक्रारींची दखल घेत योग्य कारवाई केली जावी, अशी मागणी आता विविध स्तरांतून होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लातूर : 1 कोटीच्या विम्यासाठी लिफ्ट मागणाऱ्याला कारमध्ये जिवंत जाळलं, अर्धी हाडं उरली, आरोपीला अटक

    follow whatsapp