सांगली : बिबट्याचा युवकावर हल्ला, पण रॉट व्हिलर अन् बेल्जियम शेफर्डने प्राण वाचवले, बिबट्याने झाडावर पळ काढला

Sangli News : या वेळी भरत साळुंखे यांच्यासोबत रॉट व्हिलर आणि बेल्जियम शेफर्ड जातीची दोन पाळीव कुत्री होती. मालकावर हल्ला होत असल्याचे लक्षात येताच या दोन्ही कुत्र्यांनी जोरदार प्रतिकार केला. कुत्र्यांच्या आक्रमकतेमुळे बिबट्या गोंधळून गेला. त्याने एका पिल्लासह उसाच्या शेतातून पलायन केले.

Sangli News

Sangli News

मुंबई तक

15 Dec 2025 (अपडेटेड: 15 Dec 2025, 03:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सांगली : बिबट्याचा युवकावर हल्ला, पण रॉट व्हिलर अन् बेल्जियम शेफर्डने प्राण वाचवले,

point

बिबट्याने पिल्लांसह झाडावर पळ काढला

Sangli News : देवराष्ट्रे (ता. कडेगाव, जि. सांगली) परिसरात शनिवारी दुपारी थरारक प्रसंग घडला. शेतात ऊसतोड करत असताना एका युवकावर अचानक बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकाची प्रसंगावधानता आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन पाळीव कुत्र्यांच्या धाडसामुळे त्याचे प्राण वाचले. या घटनेनंतर बिबट्याने झाडावर पळ काढला, तर त्याची पिल्ले झाडावर अडकून पडली.

हे वाचलं का?

अधिकची माहिती अशी की, देवराष्ट्रे येथील भरत साळुंखे हे दुपारी शेतात काम करत होते. ऊसाच्या शेतालगत असलेल्या झाडीत काही हालचाल जाणवली. शेतात वन्यप्राण्यांची हालचाल असल्याच्या संशयाने त्यांनी सावधपणे जवळ जाऊन पाहिले. त्याचवेळी दोन पिल्लांसह असलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. क्षणात परिस्थिती ओळखत भरत यांनी चपळाईने बाजूला होऊन हल्ला टाळला.

या वेळी भरत साळुंखे यांच्यासोबत रॉट व्हिलर आणि बेल्जियम शेफर्ड जातीची दोन पाळीव कुत्री होती. मालकावर हल्ला होत असल्याचे लक्षात येताच या दोन्ही कुत्र्यांनी जोरदार प्रतिकार केला. कुत्र्यांच्या आक्रमकतेमुळे बिबट्या गोंधळून गेला. त्याने एका पिल्लासह उसाच्या शेतातून पलायन केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा : पोलीस कॉन्स्टेबलचा 5 कोटींचा बंगला पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांना शब्द फुटेनात, प्राडाच्या वस्तू अन् महागड्या ब्रँडची सजावट

दरम्यान, बिबट्याची आणखी दोन पिल्ले शेतालगत असलेल्या ओढ्याच्या काठावरील दाट झाडीत लपलेली होती. कुत्री त्या दिशेने गेल्याचे पाहताच घाबरलेल्या पिल्लांनी जवळच्या झाडावर चढून आसरा घेतला. काही वेळातच झाडाखाली नागरिक, शेतकरी आणि दोन कुत्री जमा झाल्याने पिल्ले झाडावरच अडकून राहिली. तब्बल तीन तास हा तणावपूर्ण घटनाक्रम चालला.

घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर सागरेश्वर अभयारण्याचे वनक्षेत्रपाल बालाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनपाल एस. एस. कुंभार, एस. टी. गवते, वनरक्षक रोहन मेक्षे, एम. एम. मुसळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आवश्यक खबरदारी घेत बिबट्याच्या पिल्लांची सुरक्षितरीत्या सुटका करण्यात आली.

या घटनेमुळे देवराष्ट्रे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी सतर्क झाले आहेत. ऊस व दाट झाडीमुळे वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान, भरत साळुंखे यांच्या धैर्याबरोबरच त्यांच्या कुत्र्यांच्या शौर्याची परिसरात चर्चा होत असून, त्यांच्या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

राजगुरुनगर हादरलं, शिक्षक शिकवत असताना दहावीतील पुष्कराजचा गळा चिरला, खासगी क्लासमध्ये लहान मुलांचे गँगवॉर

    follow whatsapp