Maval Crime News : मावळ तालुक्यातील उर्से गावात एका पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी समीर कुमार मंडळ (वय 30, रा. उर्से, मूळ रहिवासी झारखंड) या आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीचे वडील कामानिमित्त पुण्यात गेले होते. शनिवारी तिची आई देखील मजुरीसाठी बाहेर गेल्याने घरात ती एकटीच होती. संध्याकाळनंतर आई घरी परतली असता मुलगी घरात नसल्याचे तिच्या लक्षात आले. यानंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने परिसरात शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुलीचा काहीही ठावठिकाणा लागू शकला नाही.
दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत आरोपीने घराजवळीलच परिसरात मुलीला फूस लावून नेल्याचे स्पष्ट झाले. काही अंतरावर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. या भीषण घटनेची नोंद मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास करण्यात आली.
हेही वाचा : अहो, मला भेटायला या, सौंदर्याची खाण असलेल्या DSP चा उद्योगपतीवर लव्ह ट्रॅप, चॅटींग सोशल मीडियावर व्हायरल!
गुन्हा दाखल होताच मावळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, तसेच स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयाची सुई समीर मंडळकडे वळली. काही तासांच्या आत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या घटनेनंतर उर्से गावासह मावळ तालुक्यात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराने नागरिक सुन्न झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अनेक नागरिकांनी पोलिस ठाण्याबाहेर जमून संताप व्यक्त केला.
दरम्यान, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून गावात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीविरोधात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून समाजात संताप आणि अस्वस्थता पसरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
दोन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या जालन्यातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली
ADVERTISEMENT











