नवी दिल्ली : महाराष्ट्रात 2012 साली घडलेल्या अत्यंत अमानुष घटनेतील दोषी आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी नामंजूर केली आहे. जालना येथील या प्रकरणात दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार व नंतर हत्या केल्याबद्दल आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका ठरली आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणातील आरोपी रवी अशोक घुमारे याने 8 मार्च 2012 रोजी जालना शहरातील इंदिरानगर परिसरात दोन वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे तपासात उघड झाले होते. या संतापजनक घटनेनंतर 16 सप्टेंबर 2015 रोजी स्थानिक सत्र न्यायालयाने घुमारे याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
हेही वाचा : पुण्यात हुंडा प्रथा सुरुच, फॉर्च्युनरसह 55 तोळे सोने, विवाहितेवर सासऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप
ही शिक्षा जानेवारी 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही कायम ठेवली. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळत 3 ऑक्टोबर 2019 रोजी फाशीची शिक्षा अंतिम ठरवली होती.
न्यायालयाची कठोर भूमिका
फाशीची शिक्षा कायम ठेवताना न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरिमन यांनी निकालात आरोपीच्या कृत्यावर कोणतीही दया दाखवता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. केवळ लैंगिक वासना शमवण्यासाठी आरोपीने सर्व नैसर्गिक, सामाजिक आणि कायदेशीर बंधने पायदळी तुडवल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.
न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले होते की, आरोपीने एका निष्पाप बालिकेचे आयुष्य उमलण्याआधीच निर्दयपणे संपवले. वडिलकीच्या प्रेमाचे, संरक्षणाचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी त्याने तिला वासनेचा बळी बनवले. हे प्रकरण विश्वासघाताचे, सामाजिक मूल्यांच्या ऱ्हासाचे आणि विकृत मानसिकतेचे अत्यंत क्रूर उदाहरण असल्याचे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











