Badlapur Crime News : पत्नीचा मृत्यू मेंदूतील रक्तस्रावामुळे झाल्याचा बनाव तब्बल तीन वर्षे टिकवून ठेवणाऱ्या पतीचा धक्कादायक गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. बदलापूर पोलिसांनी सखोल तपास करत पत्नीची हत्या सर्पदंशाच्या माध्यमातून करण्यात आल्याचा पर्दाफाश केला असून या प्रकरणात पतीसह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
रूपेश आंबेरकर असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव असून त्याची पत्नी नीरजा आंबेरकर यांचा मृत्यू 10 जुलै 2022 रोजी बदलापूर पूर्वेतील एका निवासी इमारतीत झाला होता. त्या वेळी रूपेशने पत्नीचा मृत्यू अचानक ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे सुरुवातीला हा प्रकार नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आला होता. मात्र, आता पोलिस तपासातून समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे.
पोलिस तपासानुसार, रूपेश आंबेरकर याने पत्नीचा काटा काढण्यासाठी पूर्वनियोजित कट रचला होता. या कटात त्याने आपल्या मित्रांची मदत घेतली. घटनेच्या दिवशी पत्नीच्या पायाला मालिश करून देण्याचा बहाणा करत त्याने कुणाल चौधरी, सर्पमित्र चेतन दुधाणे आणि हृषीकेश चाळके यांना आपल्या घरी बोलावले होते. सर्व काही पूर्वनियोजनानुसार घडवून आणण्यात आले होते.
तपासात उघड झाले की, सर्पमित्र चेतन दुधाणे हा एका बरणीत नाग घेऊन आला होता. मालिश सुरू असल्याचा आभास निर्माण करत त्या नागाला बरणीतून बाहेर काढून हृषीकेश चाळके याच्या हातात देण्यात आले. त्यानंतर हृषीकेशने त्या नागाच्या सहाय्याने नीरजा आंबेरकर यांच्या पायावर सलग तीन वेळा सर्पदंश घडवून आणला. विषाच्या तीव्र परिणामामुळे नीरजाचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर रूपेश आंबेरकर याने मोठ्या शिताफीने हा प्रकार ब्रेन हॅमरेजमुळे झालेल्या मृत्यूसारखा भासवला. कोणालाही संशय येऊ नये यासाठी त्याने सर्व प्रक्रिया नैसर्गिक मृत्यूप्रमाणे पार पाडल्या. त्यामुळे हा गुन्हा तब्बल तीन वर्षे दडून राहिला.
मात्र, अलीकडेच एका वेगळ्या गुन्ह्यात हृषीकेश चाळके पोलिसांच्या ताब्यात आला. चौकशीदरम्यान त्याच्याकडून या जुन्या हत्येची माहिती समोर आली. त्यानंतर बदलापूर पोलिसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला. आरोपींचे जबाब, तांत्रिक पुरावे आणि इतर महत्त्वाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला.
या तपासाअंती नीरजाचा पती रूपेश आंबेरकर, त्याचा मित्र कुणाल चौधरी आणि सर्पमित्र चेतन दुधाणे यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे वैवाहिक नात्याला कलंक लावणाऱ्या या निर्दयी हत्येची चर्चा परिसरात सुरू असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











