Dismissed UP cop's bungalow in posh Lucknow locality of rs 5 Crore : लखनौ : पोलीस खात्यातील 40 हजार पगार असणाऱ्या एका कॉन्स्टेबलकडे एवढी अफाट श्रीमंती कशी जमू शकते, हा प्रश्न अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनाच पडला. कफ सिरपच्या बेकायदेशीर व्यापारात अडकलेल्या आणि सेवेतून बडतर्फ झालेल्या आलोक प्रताप सिंगच्या लखनौमधील आलिशान बंगल्याने तपास यंत्रणांचे डोळे दिपवले. साधा कॉन्स्टेबल म्हणून ओळख असलेला हा व्यक्ती प्रत्यक्षात ऐषआरामी आयुष्य जगत होता, याचे धक्कादायक चित्र छाप्यांमधून समोर आले आहे.
ADVERTISEMENT
लखनौ–सुलतानपूर महामार्गालगत सुमारे 7 हजार चौरस फुटांच्या परिसरात उभारलेला हा दोन मजली बंगला म्हणजे दिखाऊ श्रीमंतीचा नमुना आहे. युरोपियन पद्धतीची अंतर्गत सजावट, गोलाकार जिने, उंच खांब, रुंद बाल्कनी, कोरीव कठडे आणि जुन्या काळातील प्रकाशयोजना पाहून ईडीचे अधिकारीही क्षणभर स्तब्ध झाले. या बंगल्याच्या केवळ अंतर्गत सजावटीसाठीच दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तर संपूर्ण बांधकामाची किंमत पाच कोटींच्या आसपास पोहोचते, असे तपासात समोर येत आहे.
छाप्यादरम्यान घरातून प्राडा आणि गुच्चीसारख्या नामांकित ब्रँडच्या हँडबॅग्ज, प्रीमियम राडो घड्याळे, महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि लक्झरी वस्तूंचा साठा सापडला. एका बाजूला पोलिस खात्यातील शिस्त, नियम आणि जबाबदारीचा बडगा मिरवायचा आणि दुसऱ्या बाजूला काळ्या पैशातून ऐषआराम उभारायचा हा दुटप्पीपणा तपास यंत्रणांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. सरकारमान्य मूल्यांकन अधिकाऱ्याची नियुक्ती करून या संपत्तीचा नेमका हिशोब लावण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा : दोन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या जालन्यातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली
आलोक प्रताप सिंगला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) अटक केली. कफ सिरप रॅकेटच्या तपासात त्याचे नाव पुढे आले. यापूर्वीही त्याची कारकीर्द वादांनी भरलेली होती. 2006 साली चार किलो लुटलेल्या सोन्याच्या प्रकरणात तो अडकला, तेव्हा सेवेतून काढून टाकण्यात आले. नंतर निर्दोष सुटल्यावर पुन्हा नोकरी मिळाली; मात्र 2019 मध्ये पुन्हा आरोपांमुळे त्याची बडतर्फी झाली. त्यानंतर त्याने ‘व्यवसाय’ सुरू केला आणि हाच व्यवसाय पुढे कफ सिरपच्या काळ्या धंद्याशी जोडला गेला, असा आरोप आहे.
तपासात असेही उघड झाले आहे की, हा माजी कॉन्स्टेबल चंदौली, गाझीपूर, जौनपूर आणि वाराणसीसारख्या जिल्ह्यांतील तरुणांना हाताशी धरून संपूर्ण जाळे उभे करत होता. पोलिस व राजकीय ओळखींचा गैरवापर करून बेकायदेशीर साठवणूक आणि पुरवठा सुरळीत चालवला जात होता, असा संशय व्यक्त केला जात आहे.
हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, मोठ्या रॅकेटचे धागेदोरे उघड करत आहे. कोडीनयुक्त कफ सिरपची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्या टोळीवर सरकारने विशेष तपास पथक नेमले आहे. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत सुमारे साडेचार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 32 जणांना अटक झाली आहे, तर शेकडो आस्थापनांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर होती, तोच जर कायद्याला हरताळ फासून कोट्यवधींची संपत्ती उभारत असेल, तर हा केवळ गुन्हा नाही तर व्यवस्थेवरचा गंभीर प्रश्नचिन्ह आहे. आलोक प्रताप सिंगचा हा ‘प्राडा-प्रकरणी’ उघडा पडलेला चेहरा पोलिस खात्यालाही आरसा दाखवणारा ठरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
चिखलदरा : दरीत चाललेली ट्रॅव्हरल अडवताना चालक चिरडला गेला, पण एका झाडामुळे 20 प्रवाशांचा जीव वाचला
ADVERTISEMENT











