लातूर : 1 कोटीच्या विम्यासाठी लिफ्ट मागणाऱ्याला कारमध्ये जिवंत जाळलं, अर्धी हाडं उरली, आरोपीला अटक

Latur Crime : चौकशीत गणेश चव्हाणने धक्कादायक कबुली दिली. तब्बल 57 लाख रुपयांच्या कर्जाखाली दबलेला असून, सुमारे तीन कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आपण हा प्रकार केल्याचे त्याने मान्य केले. कारमध्ये जळालेली व्यक्ती म्हणजे आपणच असल्याचा बनाव रचल्याचेही त्याने कबूल केले.

Latur Crime

Latur Crime

मुंबई तक

16 Dec 2025 (अपडेटेड: 16 Dec 2025, 09:00 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लातूर : 1 कोटीच्या विम्यासाठी लिफ्ट मागणाऱ्याला कारमध्ये जिवंत जाळलं

point

अर्धी हाडं उरली, आरोपीला अटक

लातूर : प्रचंड कर्जबाजारीपणातून सुटका मिळवण्यासाठी आणि कोट्यवधी रुपयांच्या विम्याचा लाभ उचलण्यासाठी एका व्यक्तीने थरकाप उडवणारा कट रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री कार जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून, स्वतःच्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी आरोपीने दुसऱ्यालाच कारमध्ये बसवून जिवंत जाळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

शनिवारी मध्यरात्री डायल 112 वर वानवडा पाटी–वानवडा मार्गावर एका कारला आग लागल्याची माहिती मिळताच औसा पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आग विझवल्यानंतर कारच्या आत अर्धवट जळालेला मानवी सांगाडा आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत जागेवरच शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली.

जळालेल्या कारचा क्रमांक तपासल्यावर वाहन एमएच 43 एबी 4200 हे औसा तांड्यातील बळीराम गंगाधर राठोड यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, हे वाहन त्यांचा मेहुणा गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी गणेश चव्हाणचा शोध सुरू केला. त्याच्या पत्नीने 13 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता मित्राला लॅपटॉप देण्यासाठी तो घराबाहेर पडला असून, त्यानंतर तो परतलाच नसल्याचे सांगितले.

घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल चॅटिंगच्या आधारे तपासाची चक्रे फिरवण्यात आली. संशय अधिक बळावताच पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ताब्यात घेतले. चौकशीत गणेश चव्हाणने धक्कादायक कबुली दिली. तब्बल 57 लाख रुपयांच्या कर्जाखाली दबलेला असून, सुमारे तीन कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आपण हा प्रकार केल्याचे त्याने मान्य केले. कारमध्ये जळालेली व्यक्ती म्हणजे आपणच असल्याचा बनाव रचल्याचेही त्याने कबूल केले.

दरम्यान, जळालेली व्यक्ती नेमकी कोण आहे, ती लिफ्ट मागणारी अनोळखी व्यक्ती आहे की अन्य कुणी, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या अमानुष कृत्यामागील संपूर्ण साखळी उलगडण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Muncipal Corporation Election: मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान

    follow whatsapp