Pune Crime : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात प्रियकराच्या छळाला कंटाळून एका महिलेने आपल्या मुलाच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली. 7 जानेवारी रोजी दारु पार्टीच्या बहाण्याने नदीकाठी नेऊन तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला गेला. 11 जानेवारी रोजी त्या तरुणाचा मृतदेह सापडला. सीसीटीव्ही, दारुच्या बाटल्या आणि सिगारेटच्या अवशेषांवरून सुगावा घेत पोलिसांनी 20 दिवसांनंतर तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रील पोस्ट करण्यासाठी नकार दिला; बायकोने युट्यूब व्हिडीओ पाहिला अन् एका रात्रीत नवऱ्याला संपवलं
मुलाच्या मदतीने काढला प्रियकराचा काटा
मृत तरुणाचे नाव मुंजा धोंडीबा नरहरे (वय 25) असे आहे. त्याचे उषा नानासाहेब चव्हाण (वय 40) हिच्याशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंजा उषाला मारहाण करत असे आणि तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून उषा चव्हाणने तिचा मुलगा निखिल नानासाहेब चव्हाण (वय 21) याला सर्व हकीकत सांगितली. यानंतर निखिल आणि उषाने मिळून मुंजाच्या हत्येचा कट रचला. या कटात निखिलचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सामील करून घेण्यात आले.
आधी पार्टी, मग दगडाने ठेचले
7 जानेवारी रोजी उषाने मुंजा नरहरेला चाकणमध्ये भेटायला बोलावले. गंगाखेडवरून चाकणला पोहोचलेल्या मुंजाला निखिल आणि स्वप्नीलने दुचाकीवर बसवले. त्यानंतर तिघांनी खराबवाडी येथील दुकानातून दारु विकत घेतली आणि बिरदवाडीजवळील एका निर्जन नदीकाठी जाऊन पार्टी केली. दारु पित असतानाच निखिल आणि स्वप्नीलने मागून मुंजावर शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्याची ओळख पटू नये या उद्देशाने आरोपींनी दगडाने त्याचे तोंड ठेचून विद्रूप केले.
हे ही वाचा : नववीच्या विद्यार्थीनीला वर्गातल्या 5 मुलांनी निर्जनस्थळी नेलं, सहावा बाहेरुन आला अन्... हादरवणारं प्रकरण
असा झाला खूनाचा उलगडा
11 जानेवारी रोजी पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. आरोपींनी मृत व्यक्तीचा मोबाईल आणि ओळखपत्र सोबत नेल्यामुळे पोलिसांसमोर सुरुवातीला ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि परिसरातील कंपन्यांमधील कामगारांकडे चौकशी केली. घटनास्थळी सापडलेल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या थोटकांमुळे पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला. त्यावरुन खराबवाडीतील दारूच्या दुकानांमध्ये चौकशी केली असता आरोपींचा माग लागला आणि अखेर या थरारक हत्येचा उलगडा झाला.
ADVERTISEMENT











