Madhuri Elephant latest update , कोल्हापूर : गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आलेल्या नांदणी येथील मठातील माधुरी हत्तिणीला पुन्हा मठाच्या मालकीच्या जागेत परत आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मुंबईत सोमवारी उच्चस्तरीय समितीसमोर झालेल्या सुनावणीत पुनर्वसन केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रारंभिक बांधकाम परवानग्या देण्यात आल्याने हा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे. या निर्णयामुळे मठाच्या जागेत युद्धपातळीवर पुनर्वसन केंद्र उभारण्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ADVERTISEMENT
निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. मनोहरन यांच्या उपस्थितीत झालेली ही सुनावणी अत्यंत सकारात्मकपणे पार पडली, अशी माहिती नांदणी मठ संस्थानतर्फे बाजू मांडणारे वकील मनोज पाटील यांनी दिली. याआधी उच्चस्तरीय समितीच्या निर्देशानुसार डॉ. मनोहरन यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरी हत्तिणीच्या आरोग्याविषयी सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालात माधुरीची प्रकृती सध्या समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले असून, पुढील सहा महिन्यांनंतर तिची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश समितीने दिले आहेत.
सुनावणीदरम्यान माधुरी हत्तीण आणि नांदणी मठातील माहुत यांच्यातील भावनिक नातेसंबंधाचाही उल्लेख करण्यात आला. अनेक वर्षांपासून या माहुताने माधुरीची सेवा आणि देखभाल केल्याची माहिती समितीसमोर मांडण्यात आली, याची दखल घेतल्याचे वकील पाटील यांनी सांगितले. या बाबींचा एकूण निर्णयप्रक्रियेत सकारात्मक परिणाम झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नांदणी मठ संस्थान, वनतारा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मठाच्या मालकीच्या जागेत अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाशी संबंधित आवश्यक प्राथमिक परवानग्या सोमवारी मंजूर करण्यात आल्या. मठ संस्थानने महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर संबंधित शासकीय यंत्रणांकडून मिळालेल्या सर्व आवश्यक परवानग्या समितीसमोर सादर केल्या. सुनावणीवेळी वनतारातर्फे वकील शार्दुल सिंग, तर मठ संस्थानतर्फे मनोज पाटील उपस्थित होते. यासोबतच प्राणी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या पेटा संस्थेच्या प्रतिनिधी खुशबू गुप्ता यांचीही उपस्थिती होती.
या पुनर्वसन केंद्राच्या उभारणीसाठी नियोजनाच्या प्रारंभिक टप्प्यातील एकूण सात महत्त्वाच्या टप्प्यांना समितीने मान्यता दिली आहे. निविदा प्रक्रिया, तांत्रिक नियोजन आणि अंदाजपत्रक यांचा यात समावेश आहे. हे केंद्र उभारण्यासाठी किती कालावधी लागेल, तसेच सुमारे 12 कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनालाही समितीने संमती दिली असून, काम वेगाने आणि प्राधान्याने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे माधुरी हत्तिणीला पुन्हा नांदणी मठाच्या परिसरात आणण्याची आशा बळावली असून, स्थानिक भाविकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे. आता पुनर्वसन केंद्राचे काम वेळेत पूर्ण करून पुढील टप्प्यात माधुरीच्या स्थलांतराबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांचं विचित्र कृत्य, भर कार्यक्रमात नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा हिजाबच खेचला अन्…
ADVERTISEMENT











