गणेश जाधव, धाराशिव: धाराशिवमधील हॉटेल 'भाग्यश्री' हे सातत्याने चर्चेत असतं. सुरुवातीला हॉटेलमधील पदार्थ, नंतर हॉटेल मालकाने केलेल्या अनोख्या पद्धतीच्या जाहिरातीचं आणि नंतर तिथे होणाऱ्या गर्दीने. या सगळ्या गोष्टींमुळे हॉटेल भाग्यश्री हे कायम चर्चेत राहिलं आहे. त्यानंतर हॉटेल बंद असल्याने बॅनरची केलेली तोडफोड, हॉटेलमध्ये हाणामारी या सगळ्या गोष्टी सतत घडत असल्याने हॉटेल 'भाग्यश्री'ची कायम चर्चा होती. पण आता चक्क हॉटेल मालक नागेश मडके यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या अपहरण आणि मारहाणीच्या वृत्ताने एकच धाराशिवमध्ये खळबळ माजली आहे. हॉटेलचे पोस्टर फाडले, तोडफोड केली, धमक्यांचे फोन आले. या घटना घडल्यानंतर आता थेट हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्याच अपहरणाचा प्रयत्न झाला आहे.
हे ही वाचा>> Hotel Bhagyashree: 'नाद करती काय..' हॉटेल भाग्यश्री आता भलत्याच गोष्टीमुळे चर्चेत!
बुधवारी (23 जुलै) संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे. अपहरण करणाऱ्यांनी आधी हॉटेल भाग्यश्रीमध्ये जेवण केलं. नंतर फोटोसाठी मालकाला बोलावून घेतलं. फोटो काढण्यासाठी गाडीत डोकं घालताच गाडीचा दरवाजा बंद करत त्यांना थेट गाडीत खेचण्यात आलं. ज्यानंतर गाडी चालू करून मडकेंना मारहाण करण्यात आली.
पुढे गाडीमधील लोकांनी सिद्धेश्वर-वडगाव पुलाजवळ नागेश मडके यांना गाडीतून खाली ढकललं. 'हात तोडून, जिवंत मारून.. जामखेड पुलात टाकू.' अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिल्याचा दावाही नागेश मडकेंनी यावेळी केला आहे.
हे ही वाचा>> आता 'यासाठी' हॉटेल भाग्यश्री बंद ठेवण्याचा घेतला मालकाने निर्णय!
10 जुलै रोजी मडके यांना अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवसांतच अपहरण व मारहाणीचा प्रकार घडल्यानं अज्ञात हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी लैला थोरात-मडकेंनी केली आहे.
नागेश मडकेंनी मोठ्या हिंमतीनं आणि कष्टानं हॉटेल उभारलं. पण काहीजण जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा दावा अनेक वेळा मडकेंनी केला आहे. याची सत्यता पडताळून पोलिसांना बंदोबस्त करावा अशी मागणी मडके दाम्पत्यानं केली आहे.
ADVERTISEMENT
