Parbhani Accident : परभणी जिल्ह्यातील पावरी–पोखर्णी मार्गावर रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात 75 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना दुपारी साधारण 4 वाजण्याच्या सुमारास पीहेटाकळी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ घडली. दुचाकीला पाठीमागून इनोव्हा कारने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. संबंधित इनोव्हा कार नांदेड जिल्ह्यातील असून ती मुंबईतील एका महिला उपजिल्हाधिकारी यांच्या नावावर असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. अपघातावेळी त्या महिला अधिकारी आपल्या कुटुंबासह या कारने प्रवास करत होत्या. संबंधित वाहनावर "महाराष्ट्र शासन" असा उल्लेख असल्यामुळे घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद माणिकराव चव्हाण (वय 55, रा. वझुर छु, ता. मानवत) आणि त्यांचे सोबती हनुमान वैराळे हे पाथरीहून दुचाकी (क्रमांक MH-22-AS-5107) वरून आपल्या गावाकडे जात होते. याचदरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कार (क्रमांक MH-14-GD-7004) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, प्रल्हाद चव्हाण हे जागीच ठार झाले, तर हनुमान वैराळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर वझुर परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहता पाहता मोठी गर्दी जमली. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच राजकीय प्रतिनिधी देखील घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी या अपघाताबाबत तीव्र संताप व्यक्त केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
या घटनेबाबत किशन सखाराम चव्हाण यांनी पाथरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून संबंधित इनोव्हा कारच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अपघातानंतर पाथरी पोलिस ठाण्यातही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी सांगितले की, "या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. तथापि, संबंधित अधिकारी कोण आहेत याबाबत आम्ही सध्या कोणतीही माहिती देऊ शकत नाही," असे त्यांनी सांगितले. दिवाळीसाठी परतणाऱ्या लोकांसाठी आनंदाच्या क्षणी दुःखद घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांनी रस्त्यावरील वेगमर्यादा आणि सरकारी वाहनांच्या नियमभंगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
