वैयक्तिक आयुष्यातील संकटांनी खचून जायच नसतं, तर त्यांना खो देऊन परतवून लावायच असतं. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्राच्या लेकीने हाच धडा गिरवत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. जगप्रसिद्ध टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या 'TIME100 नेक्स्ट इंडिया 2026' यादीत राज्यातील अन्नधान्य संशोधक विद्या परशुरामकर (Vidhya Parshuramkar) यांना स्थान देण्यात आलंय. यामुळे त्यांच्या कामाची दखल जगभरात घेतली जाणार आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत विद्या परशुरामकर?
विद्या परशुरामकर या महाराष्ट्रातील एक अन्नधान्य विषयाशी संबंधित संशोधक आणि सामाजिक उद्योजिका आहेत. आयआयटी खरगपूरच्या अन्न तंत्रज्ञान पदवीधर असलेल्या परशुरामकर सध्या पुण्यातील 'ॲग्रोझी ऑरगॅनिक्स' या कंपनीच्या सह-संस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
परशुरामकर यांनी बाजरीच्या दळलेल्या पिठाचा खराब होण्याचा कालावधी (सेल्फ लाईफ) 10-15 दिवसांवरून थेट 6 महिन्यांपर्यंत वाढविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेत बाजरीतील लोहाची कुठलीही हानी होत नाही. त्यामुळे नैसर्गिकरीत्या लोह-समृद्ध समजल्या जाणाऱ्या बाजरीची टिकवण क्षमता वाढते.
हे ही वाचा- घटस्फोटावेळचा 'तो' टी-शर्ट पाठ सोडेना; प्रियांका चतुर्वेदींच्या 'गुगली'वर युजवेंद्र चहल क्लीन बोल्ड!
आजघडीला विद्या परशुरामकर 'मिलेट्स नाऊ' या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील 4 लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना बाजरीच्या खाद्य पदार्थांचा समावेश असलेले जेवणाचे डब्बे पुरवण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम करताहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची बाजरीतून मिळणाऱ्या पोषणमूल्यांची गरज भागवली जात आहे.
ॲनिमियाचा त्रास आणि संशोधनाची प्रेरणा
परशुरामकर यांना वैयक्तिक आयुष्यात लोहाची कमतरता (Iron Deficiency) आणि ॲनिमियाचा सामना करावा लागला होता. स्वतःच्या आरोग्याशी संबंधित संघर्षातून प्रेरणा घेत त्यांनी लोहयुक्त बाजरीला लोहाची कमतरता दूर करण्यासाठी अगदी सहजपणे उपलब्ध होणारा पौष्टिक उपाय बनवण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच सुरू केलेल्या संशोधनामुळे परशुरामकर यांना टाइम मासिकाच्या महत्वपूर्ण यादीत स्थान मिळवून दिले. शिवाय याच संशोधनामुळे त्यांनी ज्या कंपनीमध्ये इंटर्न म्हणून करिआरची सुरुवात केली, त्याच कंपनीच्या सह-संस्थापक देखील बनल्या.
संशोधन नेमके काय आहे?
आपल्या संशोधनादरम्यान परशुरामकर यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती ती म्हणजे अतिशय सहज आणि स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या बाजरीमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते. मात्र बाजरीमधील लायपेज (Lipase) नावाच्या एन्झाइममुळे बाजरीचे पीठ दळल्यानंतर लवकर खराब होते. साहजिकच बाजरीवर प्रक्रिया करून त्यापासून नवीन खाद्य-पदार्थांच्या निर्मितीवर नैसर्गिक मर्यादा येतात.
बाजरीवरील प्रक्रियेसंदर्भातील हीच अडचण दूर करण्यासाठी परशुरामकर यांनी लायपेज एन्झाइम निष्क्रिय करण्याची प्रक्रिया विकसित केली. विशेष म्हणजे कुठल्याही बाह्य रसायनांच्या वापराशिवाय ही प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे बाजरीमधील लोहाच्या प्रमाणात कुठलीही घट होत नाही. साहजिकच, या संशोधनामुळे टिकवण क्षमता वाढल्याने लोह-समृद्ध बाजरीची लोहाची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने उपयुक्तता वाढली आहे.
हे ही वाचा- 23 वर्षीय यश पाटलांचा नादच करायचा नाय!, दीड वर्षात उभी केलेली कंपनी विकली तब्बल 40 हजार कोटींना
विद्या परशुरामकर यांच्या बाजरीसंदर्भातील संशोधनाच्या या कार्याची दखल गतवर्षी रोहिणी नय्यर पुरस्काराच्या (Rohini Nayyar Prize) स्वरूपात देखील घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे परशुरामकर त्यावेळी या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या होत्या. हा सन्मान स्वीकारताना त्या म्हणाल्या होत्या , "मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मला स्वतःलाही लोहाच्या कमतरतेचा (ॲनिमियाचा) त्रास झाला होता."
परशुरामकर यांचा टाइम 100 नेक्स्ट इंडिया 2026' यादीतील समावेश हे खाद्य तंत्रज्ञान, पोषण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या भरीव कामाची पोचपावती आहे. आता देशासह जगभरात या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांची त्यांच्या कामावर नजर असणार आहे.
ADVERTISEMENT












