मुंबई: केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची उत्सुकता वाढली होती. आता नैऋत्य मान्सूनने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली असून पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 8 जूनपर्यंत नैऋत्य मान्सूनने अरबी समुद्राचा काही भाग, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भाग तसेच कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांपर्यंत प्रगती केली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि कोकणातील काही भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवसांत त्याची आगेकूच आणखी वाढणार आहे.
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने जाहीर केलेल्या पर्जन्यमान नकाशानुसार कोकण-गोवा आणि किनारी कर्नाटक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांना निळ्या रंगाने दर्शविण्यात आले असून सर्वाधिक पावसाचा अंदाज याच भागांसाठी व्यक्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Govt Jobs : भारत पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांसाठी हिरवा रंग दर्शविण्यात आला आहे. याचा अर्थ या भागांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर काही भागांत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही भागांत पाऊस आणि उष्णतेचा दुहेरी परिणाम
विशेष म्हणजे, राज्यातील काही भागांमध्ये पावसासोबत उष्णतेचाही प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा>> मुंबईची खबर : मान्सूनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांवर पाणीसंकट? कारण काय?
हवामान तज्ज्ञांच्या मते, कोकण किनारपट्टीवर निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आणि उत्तर भारतापासून तेलंगणापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण होत आहे. त्यामुळे ढग तयार होत असले तरी सर्वत्र सातत्याने पाऊस पडेलच असे नाही.
काही ठिकाणी पावसानंतर पुन्हा सूर्यप्रकाश वाढल्याने तापमानात वाढ होऊ शकते. त्यामुळे काही भागांत उष्ण व दमट वातावरणाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा
हवामान विभागाने दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
आजचा जिल्हानिहाय अंदाज
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट लागू आहे.
15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून
हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून मुंबईपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची आगेकूच आणखी वेगाने होऊन 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली येऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, हवामानातील बदलांनुसार अंदाजात काही प्रमाणात बदल होऊ शकतो. मात्र सध्या उपलब्ध परिस्थितीनुसार येत्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती स्पष्टपणे दिसून येणार आहे.
ADVERTISEMENT












