Beed Accident, रोहिदास हातागळे : बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील मुगाव मार्गावरील शृंगेरी घाटात काल (3 ऑक्टोबर) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. ऊस वाहतूक करणाऱ्या एका मोकळ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातानंतर ट्रकला अचानक भीषण आग लागली, ज्याचे लोळ दूरवर दिसत होते. ट्रकच्या तीव्र आगीमुळे परिसरातील डोंगरालाही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू
घटना समजताच मुगाव येथील तरुण व सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ट्रक अत्यंत खोल दरीत कोसळलेला असल्यामुळे आणि आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सुरुवातीला मदतकार्यात अडथळे निर्माण झाले. स्थानिक युवकांनी धाडस दाखवून जवळ जाऊन पाहणी केली असता, चालक सागर सोमनाथ इंदलकर हा या भीषण आगीत होरपळून जागीच मृत पावल्याचे निदर्शनास आले.
हे ही वाचा : Maharashtra Weather : दिवाळी सणाच्या तोंडावर मुरासू चक्रीवादळ, 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट
बचावकार्यात अडथळे
माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेत पुढील तपास सुरू केला. तीव्र आग आणि दरीची खोली यामुळे बचावकार्यात मोठी अडचण येत असून परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आणि आगीपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : कराड : महिला पोलिसाचं उड्डाणपुलावर सेलीब्रेशन, केक कापत आतषबाजी, व्हिडीओ व्हायरल
अपघाताच्या कारणाचा शोध सुरु
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घाट व डोंगराळ भागातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने नागरिकांना पोलिसांच्या तपास व मदतकार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, ब्रेक फेल होण्याच्या कारणाचा व इतर तांत्रिक बाबींचा कसून शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT












