कराड : महिला पोलिसाचं उड्डाणपुलावर सेलीब्रेशन, केक कापत आतषबाजी, व्हिडीओ व्हायरल
Karad News woman police birthday celebration flyover viral video : कराडमधील कोल्हापूर नाका-नांदलापूर उड्डाणपुलावर महिला पोलीस कर्मचाऱ्याने नव्या कारसोबत वाढदिवस साजरा केला. कारच्या बोनेटवर केक कापतानाचा आणि पायरो गनमधून आतषबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कराड : महिला पोलिसाचं उड्डाणपुलावर सेलीब्रेशन
केक कापत आतषबाजी, व्हिडीओ व्हायरल
Karad News woman police birthday celebration flyover viral video : कराडमधील कोल्हापूर नाका ते नांदलापूरदरम्यानच्या उड्डाणपुलावर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने नव्या कारवर बसून वाढदिवस साजरा केला. कारच्या बोनेटवर केक ठेवून तो कापण्यात आला, तर पायरो गनमधून आतषबाजी करण्यात आली. या वाढदिवसाच्या सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानतंर या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे गाडी उभी करून वाढदिवस साजरा करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, याच उड्डाणपुलावर काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या वाढदिवसाच्या सोहळ्यावरून पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.
हेही वाचा : 42 वर्षांनंतर देसाई कुटुंबाचा सदस्य जिल्हा बँकेत; शंभूराज देसाईंनी केला सत्यजित पाटणकरांचा पराभव
सार्वजनिक रस्त्यावरील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
कराडमधील कोल्हापूर नाका ते नांदलापूरदरम्यान सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आहे. काही महिन्यांपूर्वी या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या मार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली. या उड्डाणपुलावर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या नव्या कारसोबत वाढदिवस साजरा केला. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडीओमध्ये कारच्या बोनेटवर केक ठेवून वाढदिवस साजरा करताना त्या दिसत आहेत. या सोहळ्यासाठी फुलांचा गुच्छ आणि आकर्षक रोषणाईची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पायरो गनच्या माध्यमातून सोनेरी उडवण्यात आल्या. संपूर्ण वाढदिवसाचे चित्रीकरण करण्यात आले असून, त्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या व्हिडीओमुळे आता संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाच्या सोहळ्याची चर्चा होण्याऐवजी सार्वजनिक रस्त्यावरील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय, आता पडळकरांचं जयंत पाटलांना त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर
उड्डाणपुलावर काही दिवसांपूर्वी भीषण झाला होता अपघात
विशेष म्हणजे, याच कोल्हापूर नाका ते नांदलापूर उड्डाणपुलावर काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी कोल्हापूरहून साताऱ्याच्या दिशेने जाणारी एक कार या उड्डाणपुलावर अपघातग्रस्त झाली होती. या अपघातात चार तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर उड्डाणपुलावरील वाहनांचा वेग आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला होता. चार जणांचा जीव गेलेल्या याच ठिकाणी आता महिला पोलीस कर्मचाऱ्याने कार उभी करून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांकडून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या उड्डाणपुलावर वाहन उभे करून अशा प्रकारे कार्यक्रम करणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकारामुळे केवळ वाहतूक नियमांचाच नव्हे, तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीचाही मुद्दा चर्चेत आला आहे. सामान्य नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा पोलीस विभागाकडून केली जाते. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांनीही सार्वजनिक रस्त्यांवर नियम आणि सुरक्षिततेचे भान ठेवणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या व्हिडीओप्रकरणी संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर प्रशासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे पोलीस विभाग या प्रकरणाची दखल घेऊन काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे.
