Beed Crime News, रोहिदास हातागळे, बीड : काही दिवसांपूर्वी बीड येथील सचिन जाधवर या जीएसटी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी त्यांना त्रास देत असल्याचं नमूद केलं होतं. मात्र त्यांच्या पत्नीने वेगळाच दावा केला आहे. मयुरी जाधवर असं त्या अधिकाऱ्याच्या पत्नीचं नाव आहे. 'वरिष्ठ अधिकारी माझ्या पतीचा छळ करत होते. ते आत्महत्या करुच शकत नाहीत. यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्याला शिक्षा व्हावी' अशी मागणी मयुरी जाधवर यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
मयुरी जाधवर यांनी काय आरोप केले?
मयुरी जाधवर यांनी पतीच्या आत्महत्येबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, 'आठ दिवसांपासून माझ्या पतीला मानसिक त्रास दिला जात होता. त्यांच्या गाडीमध्ये सुसाईड नोट असल्याचे सांगितले जाते, मात्र ती आम्हाला दाखवण्यात आलेली नाही.' यानंतर मयुरी यांनी मागणी केली की, 'ती सुसाईड नोट आम्हाला दाखवावी आणि समोर आलेल्या दोषी अधिकाऱ्याला थेट शिक्षा व्हावी.' तसेच माझे पती आत्महत्या करूच शकत नाहीत असा ठाम दावा करत त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. माझी फिर्याद नोंदवून आरोपीला तात्काळ अटक करावी, अशीही मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात बोलताना केली.
काय घडला होता प्रकार?
सहा दिवसापूर्वी बीड येथे राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सचिन जाधवर असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते दोन दिवसापासून बेपत्ता होते. या संदर्भात त्यांच्या पत्नीने बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. सचिन जाधवर यांची कार सोलापूर-धुळे महामार्गालगत आढळून आली. त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधवर हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. कारमध्ये कोयता आणि मडकं सापडलं आहे, त्यामुळे संशय बळावला आहे.
तक्रारीची दखल घेतली असती तर...
सचिन जाधवर यांनी त्यांना देण्यात येत असलेल्या त्रासाबद्दल वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दिली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. दखल घेतली असती तर त्यांनी आत्महत्या केली नसती अशी चर्चा होत आहे. दरम्यान, बीडमध्ये कार्यरत असलेल्या त्या अधिकाऱ्याची बदली जालन्याला झाली असूनही तो बीडमध्ये अजूनही कसा कार्यरत होता, असा सवाल सचिन यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT











