Crime News : एखाद्याचे स्वप्न दुसऱ्याच्या आयुष्यात किती मोठा भूकंप आणू शकते, याचा प्रत्यय कानपूरमधील एका अजब घटनेने दिला आहे. एका अल्पवयीन मेहुणीने पाहिलेल्या स्वप्नामुळे तिच्या हवाई दलात कार्यरत असलेल्या मेहुण्याला तब्बल सात वर्षे कायदेशीर लढाई लढावी लागली आणि 19 दिवस तुरुंगातही काढावे लागले. मात्र, अखेर शनिवारी न्यायालयाने या जवानाची सन्मानाने सुटका केली. पीडितेने न्यायालयात दिलेली साक्ष सर्वांना थक्क करणारी ठरली, कारण तिने मान्य केले की तिच्यासोबत घडलेली ती छेडछाडीची घटना वास्तव नसून केवळ एक स्वप्न होते.
ADVERTISEMENT
या प्रकरणाची पार्श्वभूमी 2019 सालातील आहे. बिठूर येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात हवाई दलात कॉर्पोरल पदावर कार्यरत असलेल्या तरुणाचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच त्याची 15 वर्षीय मेहुणी त्यांच्याकडे राहण्यास आली होती. 8 मार्च 2019 च्या रात्री ही मुलगी अचानक मोठ्याने ओरडू लागली. तिने असा आरोप केला की, ती झोपलेली असताना तिच्या मेहुण्याने तिला पकडले आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. या घटनेच्या पाच महिन्यांनंतर पीडितेच्या वडिलांनी नौबस्ता पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
विशेष पॉक्सो न्यायालयात जेव्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली, तेव्हा पीडितेने दिलेला जबाब ऐकून न्यायाधीशही चकित झाले. पीडितेने सांगितले की, त्या रात्री तिने अँटीबायोटिक औषध घेतले होते आणि ती गाढ झोपेत होती. झोपेत तिला असे वाटले की तिच्या मेहुण्याने तिला पकडले आहे, ज्यामुळे ती घाबरून ओरडू लागली. तिने स्पष्ट केले की, ती केवळ एक स्वप्न होते आणि प्रत्यक्षात मेहुण्याने तिला स्पर्शही केला नव्हता. केवळ औषधांच्या प्रभावामुळे तिला तो भास झाला होता. इतकेच नाही तर पीडितेचे वडील आणि आरोपीची पत्नी यांनीही न्यायालयात कबुली दिली की, केवळ गैरसमजातून त्यांनी हा खटला दाखल केला होता.
वरिष्ठ अधिवक्ता करीम अहमद सिद्दीकी यांनी सांगितले की, या एका चुकीच्या समजामुळे हवाई दलातील जवानाला मोठी किंमत मोजावी लागली. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांच्यावर गंभीर कलमान्वये आरोप निश्चित करण्यात आले होते आणि त्यांना 19 दिवस तुरुंगातही राहावे लागले. या प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेत त्यांचे मानसिक आणि सामाजिक नुकसान झाले. अखेर पीडितेने सत्य स्वीकारल्याने आणि पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. स्वप्न आणि वास्तवातील गोंधळाने एका निष्पाप व्यक्तीचे सात वर्षे कसे उद्ध्वस्त केले, याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











