Crime News : शिक्षकाने भावी पिढ्यांना संस्कार द्यायचे अशी समाजाची अपेक्षा असते. पण जर शिक्षकच चुकीचं वागत असेल तर? असंच चुकीचं वागणाऱ्या एका मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला. मात्र यानंतर पोलिसांनी गावातीलच लोकांना अटक केली आहे. गावकऱ्यांनी मुख्याध्यापकावर गावातील महिलांशी छेडछाड आणि त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला आहे. ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील ही घटना आहे. गावकऱ्यांनी मुख्याध्यापकासोबत नेमकं काय केलं, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : काँग्रेस नेत्याची आमदारकी रद्द, उच्च न्यायालयाने भाजपच्या पराभूत उमेदवाराला आमदार करुन टाकलं, नेमकं कारण काय?
'कांगारु कोर्टा'चा निर्णय
सुंदरगड जिल्ह्यातील एका निवासी शाळेचा हा मुख्याध्यापक आहे. त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी त्याला घेराव घातला आणि महिलांसह अनेक लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर एका कथित 'कांगारु कोर्टाच्या' (गावपातळीवरील अनधिकृत पंचायत) निर्णयानुसार, मुख्याध्यापकाच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांना संपूर्ण गावात फिरवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुख्याध्यापकाची जमावाच्या तावडीतून सुटका केली. पीडित मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी चार गावकऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.
गावकऱ्यांचा काय आरोप आहे?
दुसरीकडे, गावकऱ्यांनी असा दावा केला आहे की, मुख्याध्यापक गावातील अनेक महिलांशी अश्लील वर्तन करत असत. शाळेतील स्वयंपाकी महिलेसोबत त्यांचे अनैतिक संबंध होते आणि ते त्या महिलेवर तिच्या पतीला व तीन मुलांना सोडण्यासाठी दबाव टाकत होते, असाही आरोप गावकऱ्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर मुख्याध्यापकाने त्या महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा : केतूचे भ्रमण आणणार समृद्धी, राजयोगासारखं सुख मिळणार, 'या' तीन राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु
चौघांना अटक
सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोन्ही बाजूंच्या आरोपांची शहानिशा केली जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले आणि शिक्षकाचा जीव वाचवला. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT











