Crime News : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या नजरेतून वाचण्यासाठी तो मागे एखादा पुरावा सोडतोच, याचा प्रत्यय पाटणा शहरात आला आहे. शहरी भागातील जल्ला महावीर मंदिराजवळ एका 10 वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना केवळ शेळीच्या केसांनी पोलिसांना खुन्याच्या दारापर्यंत पोहोचवले. 23 एप्रिल रोजी एका अरुंद गल्लीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एका घोंगडीत गुंडाळलेला या मुलीचा मृतदेह सापडला होता. ही मुलगी घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता आणि पोलिसांवर आरोपीला पकडण्यासाठी मोठा दबाव होता.
ADVERTISEMENT
तपासाची चक्रे आणि शेळीच्या केसाचा सुगावा
पाटण्याचे एसएसपी कार्तिकेय के. शर्मा यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, तपासादरम्यान पोलिसांची नजर त्या घोंगडीवर पडली ज्यामध्ये मृतदेह गुंडाळला होता. या घोंगडीची बारकाईने तपासणी केली असता त्यावर शेळीचे काही केस चिकटलेले आढळले. या एका लहानशा सुगाव्यावरून पोलिसांनी असा अंदाज लावला की, आरोपी आसपासचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे शेळ्या पाळलेल्या असाव्यात. पोलिसांनी तातडीने परिसरातील गल्ल्यांची झडती सुरू केली. एका बंद खोलीबाहेर 4-5 शेळ्या बांधलेल्या दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्या खोलीला बाहेरून कुलूप होते, मात्र संशयावरून कुलूप तोडले असता आत आरोपी रंजीत लपलेला आढळला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने बाहेरून कुलूप लावून घेतले होते आणि पंखा न लावता आत बसल्याने तो घामाने ओला झाला होता.
हेही वाचा : बायकोच्या प्रियकराने दिली धमकी, घाबरून नवऱ्याने केली आत्महत्या; दोन ओळींच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
अत्याचाराचा प्रयत्न आणि दगडाने वार
पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपी रंजीतने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, चुकीच्या उद्देशाने त्याने चिमुरडीला फसवून आपल्या खोलीत नेले होते. जेव्हा मुलीने प्रतिकार करत ओरडण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने खोलीत असलेल्या वरवंट्याने तिच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. या गंभीर वाराने मुलीचा जागीच मृत्यू झाला. साक्ष नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने दिवसभर तिचा मृतदेह बेडखाली लपवून ठेवला होता. रात्रीच्या अंधारात पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने हा मृतदेह घोंगडीत गुंडाळला आणि तो जवळच्या तलावात फेकण्यासाठी बाहेर निघाला. मात्र, रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या भीतीपोटी त्याने मृतदेह वाटेतच टाकला.
पोलिसांची सतर्कता आणि पुढील कारवाई
आरोपी रंजीत मृतदेह घेऊन तलावाकडे जात असताना समोरून पोलिसांची गस्ती गाडी येताना दिसली. पोलीस पकडतील या भीतीने त्याने घाईघाईत मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ टाकला आणि तिथून पळ काढला. तो खिडकीतून पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता, पण शेळीच्या केसाने त्याचे बिंग फोडले. मानपाडा पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. केवळ एका छोट्या पुराव्याच्या आधारे इतक्या गुंतागुंतीच्या हत्येचा उलगडा केल्याबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











