Dombivli Crime : डोंबिवली शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अनाथ तरुणीला तिच्याच मैत्रिणीच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर मदतीसाठी धावून आलेल्या मित्रानेच तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणी डोंबिवलीत एका खासगी ठिकाणी नोकरी करते. तिला आई-वडील नसल्याने ती एकटीच राहते. काही दिवसांपूर्वी एका क्षुल्लक कारणावरून आणि खोटा आरोप करत तिच्या मैत्रिणीच्या आई-वडिलांनी तिला मारहाण केली होती. या मारहाणीत मैत्रिणीचा बाप देखील सामील होता. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पीडितेने पोलीस ठाण्यात जाण्याचे ठरवले, मात्र सोबत कुणी नसल्याने तिने तिच्या एका ओळखीच्या तरुणाला मदतीसाठी साद घातली. मात्र, त्यानेच निर्जनस्थळी तिच्यावर बलात्कार केलाय.
ADVERTISEMENT
मदतीचा बनाव आणि निर्जनस्थळी अत्याचार
पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वीच 'स्नॅपचॅट' या सोशल मीडिया ॲपवरून क्रिश भोईर नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. मैत्रिणीच्या घरच्यांनी केलेल्या मारहाणीनंतर तक्रार देण्यासाठी सोबत कुणी नसल्याने तिने क्रिशला बोलावून घेतले. क्रिश मदतीचे नाटक करत तिला मानपाडा पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी आला. मात्र, पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी त्याने तिला एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे त्याने या अनाथ तरुणीवर बळजबरीने बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने पीडितेच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून घेतले, तिच्या 'जी-पे'वरून पैसे स्वतःच्या खात्यात वळवले आणि तिचा मोबाईल हिसकावून घेऊन तिथून पसार झाला. या दुहेरी संकटामुळे पीडित तरुणी पूर्णपणे खचून गेली होती.
हेही वाचा : जालना : गोंदेगाव येथील खून प्रकरणाचा 8 तासांत उलगडा; दोन आरोपी जेरबंद; नेमकं काय घडलं?
शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाव आणि पोलिसांची कारवाई
या कठीण प्रसंगात पीडित तरुणीच्या मदतीसाठी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तातडीने धावून आले. त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तरुणीला सोबत घेऊन मानपाडा पोलीस स्टेशन गाठले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी संपत फडोल आणि त्यांच्या पथकाकडे आरोपीला शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या एका तासात आरोपी क्रिश भोईर याला शोधून काढून त्याच्या बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस अधिकारी प्रियंका सादळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आणि तपास
पोलिसांनी अटक केलेला आरोपी क्रिश भोईर हा सराईत प्रवृत्तीचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याने यापूर्वी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर काही मुलींशी संपर्क साधून अशाच प्रकारचे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने आता मानपाडा पोलीस सखोल तपास करत आहेत. एका अनाथ तरुणीच्या विश्वासाला तडा देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील ओळखी आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना किती खबरदारी घेणे आवश्यक आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











