Delhi Crime News : राजस्थानच्या अलवरमधून पळून आलेल्या एका 19 वर्षीय तरुणाने दिल्लीच्या अमर कॉलनीसारख्या उच्चभ्रू परिसरात विकृतीचा कळस गाठल्याचं समोर आलंय. राहुल मीणा नावाच्या या तरुणाने 21 एप्रिलच्या सकाळी एका आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्यांच्या 22 वर्षीय मुलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, दिल्लीत हे कृत्य करण्याच्या अवघ्या 9 तास आधी त्याने अलवरमध्ये आपल्याच एका मित्राच्या पत्नीवरही जबरदस्ती केली होती. केवळ 46 मिनिटे तो या अधिकाऱ्याच्या घरात होता आणि याच वेळात त्याने बलात्कार, खून आणि सुमारे अडीच लाख रुपयांची लूट करून पलायन केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपीने अत्यंत नियोजित पद्धतीने हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
घराची खडान् खडा माहिती आणि जुन्या नोकराचा विश्वासघात
राहुल मीणा हा संबंधित आयआरएस अधिकाऱ्यांकडे सात महिन्यांपूर्वी नोकर म्हणून कामाला होता, त्यामुळे त्याला घराच्या दिनचर्येची पूर्ण कल्पना होती. अधिकारी आणि त्यांची पत्नी रोज सकाळी सहा वाजता जिमसाठी बाहेर जातात आणि साडेसात वाजेपर्यंत घरी परतत नाहीत, हे त्याला माहीत होते. तसेच, घरचे नोकर सकाळी 8 वाजल्यानंतर येतात आणि त्यांच्यासाठी घराची चावी एका विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवली जाते, या माहितीचा फायदा घेऊन तो घरात शिरला. घरात कोणीही नसेल असा त्याचा अंदाज होता, मात्र अभ्यासामुळे त्यांची मुलगी घरीच होती. राहुलने आधी तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी फोन चार्जरच्या वायरने गळा आवळून व जड वस्तूने डोक्यावर वार करून तिचा जीव घेतला. रक्ताचे डाग लागल्यामुळे त्याने घरातीलच कपडे आणि चप्पल चोरून वापरली आणि तेथून पळ काढला.
ऑनलाइन गेमिंगचे व्यसन आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी
राहुल मीणा हा अभ्यासात अत्यंत हुशार होता आणि त्याने बारावीत 90 टक्के गुण मिळवले होते, मात्र ऑनलाइन लूडो गेमिंगच्या व्यसनाने त्याचा घात केला. या व्यसनामुळे त्याने घरातील सामान आणि स्वतःची शैक्षणिक प्रमाणपत्रेही गहाण ठेवली होती. 20 एप्रिल रोजी त्याने आपल्या मित्राची दुचाकी त्याच्या पत्नीला परत देण्याच्या बहाण्याने मित्राचे घर गाठले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तो इको व्हॅनने दिल्लीला पोहोचला. त्याने दिल्लीत चोरी करण्याच्या उद्देशानेच आपल्या जुन्या मालकाचे घर निवडले होते, कारण त्याला पैशांची तातडीने गरज होती. या गुन्ह्यानंतर त्याने अलवरमधील आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी इंटरनेट कॉलिंगचा वापर केला, जेणेकरून पोलीस त्याला पकडू शकणार नाहीत.
वाय-फाय ट्रॅकिंग आणि पोलिसांची धडक कारवाई
या गुन्ह्याचा तपास करताना दिल्ली पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर केला. राहुलने आपला मोबाईल विकला होता आणि तो त्याच्या पीडित मैत्रिणीच्या फोनवरून इंटरनेट कॉल करत होता. पोलिसांनी त्याच्या चुलत भावाच्या फोनवर येणाऱ्या कॉल्सचे डिटेल्स पाहिले असता, तो द्वारका येथील एका हॉटेलमधील वाय-फाय वापरत असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी द्वारका येथील हॉटेलवर छापा टाकून राहुलला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका हुशार विद्यार्थ्याचा क्रूर खुनी बनण्यापर्यंतचा हा प्रवास आणि त्याने केलेले एकापाठोपाठ एक गुन्हे यामुळे संपूर्ण परिसर हादरलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











