Crime News : आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. संपत्तीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईची काठीने बेदम मारहाण करून हत्या केली. या निर्दयी हल्ल्यात मुलाने आईचे हात-पाय तोडले होते. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
जमिनीच्या वाटणीवरुन वाद
मृत महिला चानी देवी यांचा धाकटा मुलगा प्रमोद सिंह काही दिवसांपूर्वीच गुजरातहून गावी परतला होता. घरी आल्यापासून तो आईकडे वारंवार जमिनीची आणि मालमत्तेची वाटणी करण्यासाठी दबाव टाकत होता. सोमवारी (23 मार्च) उशिरा रात्री या वादाने भयानक रुप धारण केले. रागाच्या भरात प्रमोदने आपल्या वृद्ध आईला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने इतक्या अमानुषपणे मारहाण केली की वृद्ध मातेचे हात आणि पाय दोन्ही तुटले होते.
हे ही वाचा : भोंदूबाबा खरातसोबतची 'ती' डील तरीही उपजिल्हाधिकारी भांडे-पाटलांची क्रीम खात्यात बदली!
उपचारासाठी नेत असताना मृत्यू
जखमी अवस्थेत चानी देवी यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना गोरखपूरला हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, गोरखपूरला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्ट मार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आणि त्यांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.
हे ही वाचा : मुंबई : मिरा रोड परिसरात भीषण आग, गोडाऊनसह रहिवासी इमारतीचे मोठे नुकसान
जमिनीच्या तुकड्यासाठी आईचा जीव घेतला
सदर एसडीपीओ-2 राजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपी प्रमोद सिंहला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आई-मुलाच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिक नागरिक आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. जमिनीच्या तुकड्यासाठी पोटच्या मुलाने आईचा जीव घेतल्याने समाजातील वाढत्या हिंसेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











