Mumbai Urban Company Massage Therapist beats Customer : मुंबईतील वडाळा परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुकिंग रद्द केल्याच्या कारणावरुन अर्बन कंपनी ॲपच्या माध्यमातून बोलावलेल्या मसाज थेरपिस्टने एका महिलेला मारहाण केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मूल होत नसल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला संपवलं, हृदयविकाराचं कारण सांगत नातेवाईकांना...
नेमकी घटना काय?
46 वर्षीय पीडित महिला वडाळा येथे आपल्या मुलासोबत राहते. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'फ्रोजन शोल्डर'च्या उपचारासाठी तिने अर्बन कंपनीद्वारे मसाज सेवा बुक केली होती. ठरलेल्या वेळेनुसार एक महिला थेरपिस्ट त्यांच्या घरी पोहोचली. मात्र, त्या थेरपिस्टची वागणूक आणि ती सोबत घेऊन आलेला मोठा मसाज बेड पाहून पीडित महिला अस्वस्थ झाली. यामुळे पीडितेने बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला.
..म्हणून केली मारहाण
पीडितेने मसाज सेशन रद्द करुन रिफंड प्रक्रिया सुरु केल्याने थेरपिस्ट संतापली. तिने पीडित महिलेला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडितेने केलेल्या आरोपानुसार, थेरपिस्टने तिचे केस ओढले, तोंडावर बुक्के मारले, अंगावर ओरखडे ओढले आणि तिला जमिनीवर ढकलून दिले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मुलालाही थेरपिस्टने धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
घटनेदरम्यान पीडितेने पोलीस हेल्पलाइन क्रमांक 100 वर कॉल केला. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचण्याआधीच थेरपिस्ट तिथून पसार झाली होती. त्यानंतर पीडितेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध एनसी दाखल केली आहे. तपासादरम्यान असेही समोर आले की, ॲपमध्ये आरोपीचे नाव आणि ओळखीबाबत काही तांत्रिक त्रुटी होत्या, ज्या नंतर सुधारण्यात आल्या. सध्या वडाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT











