Lok Sabha 2024 : 'मविआ'त पेच, आंबेडकरांचा नवा प्रस्ताव! महाराष्ट्रात नवे समीकरण?

मुंबई तक

12 Mar 2024 (अपडेटेड: 12 Mar 2024, 06:02 PM)

Prakash Ambedkar Maha Vikas Aghadi News : प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या नव्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीत चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला काय दिला आहे नवा प्रस्ताव?

प्रकाश आंबडेकर यांनी नवा प्रस्ताव दिल्याने चलबिचल सुरू झाली आहे.

follow google news

Maharashtra Politics Explained : (अभिजित करंडे) कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि अजूनही महाविकास आघाडीचा जागावाटपाचा पेच फसलेला आहे. अशातच आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या खुल्या पत्रामुळे मविआमध्ये नवी समीकरणे जन्माला येणार आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारण ठरला आहे प्रकाश आंबेडकरांचा नवा प्रस्ताव. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून स्वतंत्र चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एकत्र बसून चर्चा करून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ज्या जागांसाठी आग्रही आहे, त्या जागांवर चर्चा करण्यासाठी आणि भाजप-आरएसएसला सत्तेपासून दूर करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

हे वाचलं का?

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 6 मार्च रोजी मविआची जागा वाटपाबाबत बैठक झाली. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, प्रकाश आंबेडकर, संजय राऊत आणि जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये काही जागांवरून खडाजंगी सुरू असल्याचे म्हटले होते. 9 तारखेला पुन्हा भेटून बोलू, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर ना मविआची बैठक झाली, ना प्रकाश आंबेडकर कोणाशी बोलले. आणि याच चिंतेत असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आज एक खुले पत्र लिहून मविआची पोलखोल केली आहे.

हेही वाचा >> भाजपने भाकरी फिरवली, पाच तासांत बदलला मुख्यमंत्री, कारण...

ज्यात प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये 10 जागांवर कोणताही तोडगा निघत नाहीये. याशिवाय इतर 5 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी (एसपी) आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यात तणाव आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप ठरत नाहीये."

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर कोणतीही चर्चा न झाल्याने सोमवारी (११ मार्च) प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आणि त्यादरम्यान, चेन्निथला यांनी आंबेडकरांशी संवाद साधताना सांगितले की, गेल्या वेळी शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या, आणि यावेळी ठाकरे 18 पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवण्यास तयार नाहीत. ते एक प्रकारे हट्ट धरून आहेत."

त्यानंतर, चेन्निथलाशी बोलताना आंबेडकरांनी एक प्रस्तावही दिला, ज्यामध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात ज्या जागांवर निवडणूक लढवायची आहे, त्यावर आपण बसून बोलू शकतो, असे म्हटले आहे. बाळासाहेब थोरात यांनी बैठकीची तारीख आणि वेळ निश्चित केल्यास भाजप आणि आरएसएसला सत्तेपासून दूर फेकण्यासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र काम करण्याची चर्चा होऊ शकते.

काँग्रेस-शिवसेनेमध्ये कोणत्या जागांवर तणाव?

महाराष्ट्रात 10 जागांवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात एकमत झालेले नाही. उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, रामटेक, सांगली, कोल्हापूर, शिर्डी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जागा आहेत.

हेही वाचा >> मनसेला पुण्यात मोठा हादरा.. राज ठाकरेंना दंडवत घालून वसंत मोरेंनी सोडली MNS

यापैकी कोल्हापूर, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या सहा जागा शिवसेनेने 2019 मध्ये जिंकल्या होत्या. मात्र येथील सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. आता जे खासदार ठाकरेंसोबत नाही, त्या जागांवर दावा करणे चुकीचे आहे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. कारण या मतदारसंघात ठाकरेंची ताकद कमी झाली आहे.

ठाकरेंकडून उमेदवारांची घोषणा... काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर

जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून स्पष्ट केले की, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे संजय निरुपम यांनीही शिवसेनेच्या या चालीवर टीका केली.

काँग्रेसला हवी आहे कोल्हापूरची जागा

श्रीमंत शाहू महाराजांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे, पण शाहू महाराजांना काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे. मशाल चिन्हावर त्यांना उमेदवारी देण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. हे शक्य न झाल्यास या मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेनेने सांगली लोकसभा जागेवर आपला दावा मजबूत केला आहे. सांगली हा महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला आहे.. आणि काँग्रेसला ती जागा सोडायची नाही.

..तर पश्चिम महाराष्ट्रात नसेल शिवसेनेचा उमेदवार

कोल्हापूरच्या जागी सांगलीची जागा दिली नाही, तर पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा उमेदवार दिसणार नाही. आणि शिवसेना नेत्यांना हे पटत नाही. त्यामुळेच काल शिवसेनेने दोन वेळा महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेऊन दावा मजबूत केला आहे. कारण पक्षप्रवेशावेळीच चंद्रहारांनीच ठाकरेंना वचन दिले की सांगलीतून चांगला निकाल येईल.

    follow whatsapp