उस्मानाबाद : गणेश जाधव
ADVERTISEMENT
उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने बाथरूममध्ये प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा बोजवारा कसा उडाला आहे हे सांगणारी घटना उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात घडली आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील हा प्रकार असून यामुळे आरोग्य यंत्रणा कशी कोलमडली आहे हे दिसून येते. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सुधारण्यासाठी डॉ.सावंत हे काय पाऊल उचलतात, पाहावं लागेल.
महिलेची बाथरूममध्ये प्रसूती
याबाबत अधिक माहिती अशी की, नारीवाडी गावच्या रुक्मिणी सुतार या मंगळवारी डिलिव्हरीसाठी स्त्री रुग्णालयात दाखल झाल्या. परंतु त्यांना आवश्यक ती सेवा मिळाली नाही, दवाखान्यात रुग्णांची झालेली फुल्ल गर्दी त्यामुळे त्यांना बेड उपलब्ध होऊ शकणार नाही, असं सांगून वॉर्डात वाट पाहण्यास सांगितलं. यानंतर वॉर्डात चकरा मारणाऱ्या रुक्मिणीला कळा सुरु झाल्याने त्या बाथरूममध्ये गेल्या असता बाथरूम मध्येच त्यांची प्रसूती झाली. त्यानंतर किमान 1 तास डॉक्टर रुग्णालयात आलेच नाहीत. मुलगा झाल्याचा आनंद असतानाच अशा पद्धतीने बाथरूममध्ये डिलिव्हरी झाल्याने रुक्मिणी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा रुग्णालयावर येतोय ताण
उपजिल्हा रुग्णालय असो की ग्रामीण रुग्णालय की उपकेंद्र या सर्व ठिकाणावरून अनेक वेळा रुग्णांना उस्मानाबाद येथे रेफर करण्यात येतं. हा प्रकार कमी झाल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालय व यंत्रनेवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
60 बेडच्या रुग्णालयात 150 रुग्ण
उस्मानाबाद स्त्री रुग्णालय हे 60 बेडचे मंजूर असून तिथे रोज किमान 125 ते 150 रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारी इतर जिल्ह्यातून दाखल होतात. त्यामुळे इथे नेहमी गर्दी असते. रुग्णांना वैद्यकीय सुविधा व बेड न मिळणे हे इथे नित्यनियमाचे झाले आहे. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात रोज रुग्णांना विविध अडचणींना सामोरे जावं लागतं. स्त्री रुग्णालयात बेड कमी आहेत. शिवाय येथे डॉक्टर व इतर स्टाफ कमी असल्याने आवश्यक त्या सुविधा देता येत नसल्याची कबुली डॉक्टर देतात. त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. तसेच स्त्री रुग्णालय हे वैद्यकीय कॉलेज किंवा जिल्हा रुग्णालयच्या इमारतील हलवणे गरजेचे असल्याचं सांगितलं जातंय.
ADVERTISEMENT
