Lakhimpur Kheri: अखेर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक; आशिष मिश्राची कोठडीत रवानगी

मुंबई तक

• 03:22 AM • 10 Oct 2021

देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेप्रकरणी अखेर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात गाडी घुसवून केलेल्या हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष ऊर्फ मोनू याला शनिवारी (9 ऑक्टोबर) रात्री अटक करण्यात आली. लखीमपूर खीरी गुन्हे शाखेनं अटकेपूर्वी आशिष मिश्राची 12 तास चौकशी केली. […]

Mumbaitak
follow google news

देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेप्रकरणी अखेर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात गाडी घुसवून केलेल्या हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष ऊर्फ मोनू याला शनिवारी (9 ऑक्टोबर) रात्री अटक करण्यात आली.

हे वाचलं का?

लखीमपूर खीरी गुन्हे शाखेनं अटकेपूर्वी आशिष मिश्राची 12 तास चौकशी केली. मिश्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी आशिष मिश्रावर हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल असलेला आशिष मिश्रा शनिवारी सकाळी 10.30 वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकासमोर हजर झाला होता.

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या चौकशी पथकाने आशिष मिश्राची जवळपास 12 तास हिंसाचारासंदर्भात चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आशिष मिश्राचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

‘केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा चौकशीला सहकार्य करत नसून, मोजक्याच प्रश्नांची उत्तरं त्याने दिली आहेत’, अशी माहिती सहारनपूरचे पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अग्रवाल यांनी दिली.

आशिष मिश्रा चौकशी पथकासमोर हजर झाल्यानंतर एका वैद्यकीय पथकाला क्राईम ब्रांच ऑफिसला बोलावण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांनी आशिष मिश्राच्या वैद्यकीय चाचण्या केल्या. अटक करण्यात आल्यानंतर आशिष मिश्राला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

लखीमपूर खीरी येथे शेतकरी निदर्शन करत असताना 3 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनात गाड्या घुसवून हिंसाचार घडवण्यात आला होता. या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आशिष मिश्रा 3 ऑक्टोबरच्या हिंसाचारानंतर फरार झाला होता. या प्रकरणाच्या हाताळणीवर बोट ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केल्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर दबाव वाढला होता. तसंच सर्वच विरोधी पक्षांनी आणि देशभरातील शेतकरी संघटनांनीही आरोपी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी लावून धरली होती. अखेर शनिवारी सकाळी तो पोलिसांसमोर हजर झाला.

उद्या महाराष्ट्र बंद

लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी सोमवारी (11 ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदला सर्वच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा द्यावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केलं आहे.

    follow whatsapp