Maharashtra DGP : रजनीश सेठ महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक, पदभार स्वीकारला

मुंबई तक

• 04:29 PM • 18 Feb 2022

उच्च न्यायालयाने फटकारताच राज्य सरकारने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती केली आहे. १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली. मागील काही वर्षांपासून राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पूर्णवेळ अधिकारी नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यासंदर्भात अॅड. दत्ता माने यांनी […]

Mumbaitak
follow google news

उच्च न्यायालयाने फटकारताच राज्य सरकारने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती केली आहे. १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली.

हे वाचलं का?

मागील काही वर्षांपासून राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पूर्णवेळ अधिकारी नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यासंदर्भात अॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. राज्याच्या पोलीस महासंचालक पदी कायम स्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं होतं.

मुंबई उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर राज्य सरकारने २१ फेब्रुवारीपर्यंत नियुक्ती करण्यासाठी वेळ मागितला होता. मागितलेला कालावधी संपण्यापूर्वीच गृह विभागाने रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. सेठ यांच्याबरोबरच डॉ.वेंकटेशम आणि हेमंत नगराळे यांच्या नावांचीही पोलीस महासंचालक पदासाठी चर्चा होती.

दरम्यान, नियुक्ती झाल्यानंतर रजनीश सेठ यांनी संजय पांडे यांच्याकडून पोलीस महासंचालक पदाची सूत्रे स्वीकारली. महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर याबद्दलचं ट्वीटही करण्यात आलं आहे.

सध्या संजय पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यांच्यापूर्वीही हेमंत नगराळे यांच्या या पदाचा अतिरिक्त पदभार होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर हेमंत नगराळे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर संजय पांडेंनी पोलीस महासंचालक पदाची अतिरिक्त पदभार घेतला होता.

कोण आहेत नवे पोलीस महासंचालक रजनीश सेठ?

महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. त्याचबरोबर मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यानंतर ‘फोर्स वन’ निर्माण करण्यात आलं. या दलाचे प्रमुख म्हणून रजनीश सेठ यांनी काम पाहिलं आहे. त्याचबरोबर गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.

    follow whatsapp